Robbery Case: व्यापाऱ्यावर दरोडा प्रकरणी ६ जणांची निर्दोष मुक्तता

0

सोलापूर,दि.२०: Robbery Case: व्यापाऱ्यावर दरोडा प्रकरणी न्यायालयाने ६ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. कापड व्यापारी गोपाळ केकडे यांच्यावर दरोडा टाकून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी राज उर्फ शैलेंद्र गोसावी यांच्यासह ६ आरोपींची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

या खटल्याची हकीकत अशी की, यातील कापड व्यापारी गोपाळ केकडे व आरोपी राज गोसावी यांच्यामध्ये व्यावसायिक मतभेद झाल्यामुळे वैमनस्य आलेले होते. दि. १२/०४/ २०१७ रोजी रात्री ९.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी गोपाळ केकडे हे आपल्या दुकानाकडे जात असताना आरोपी राज गोसावी, सनी गोसावी व अजय गडदे यांनी त्यांची मोटार सायकल अडवून त्यांना दमदाटी केली व तुला दुकानात येऊन मारतो अशी धमकी दिली.

रात्री १०.३० च्या सुमारास गोपाळ केकडे हे आपले दुकान बंद करुन दुकानातील २० हजार रुपये रक्कम ही खिशात घेऊन आपल्या मोटारसायकलवरुन घराकडे जात असताना आरोपी राज गोसावी व सनी गोसावीने त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व त्यानंतर इतर आरोपी तन्वीर पटवेकर, अजय गडदे, राहुल नाटेकर व समर्थ जाधव यांनीदेखील तेथे येवुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व सनी गोसावी याने केकडे यांच्या खिशातील २० हजार रुपये रक्कम काढून घेतली व दुकानातील कामगारास देखील मारहाण केली अशा आशयाची फिर्याद गोपाळ केकडे यांनी जोडभावी पेठ पोलीस चौकी येथे दिलेली होती. पोलिसांनी तपास करुन सदर प्रकरणी आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले.

दरोडा प्रकरणी ६ जणांची निर्दोष मुक्तता | Robbery Case

खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले की, सदर घटनेबाबत फिर्यादी केकडे यांनी एन.सी. दाखल केलेली असुन या एन. सी. मध्ये आरोपींनी २० हजार काढून घेतल्याबाबत कोणताही आरोप केलेला नाही त्यामुळे विलंबाने दाखल केलेली फिर्याद ही बनावट असल्याचा युक्तिवाद केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. मनोज गिरी, ॲड. प्रणित जाधव यांनी तर सरकारतर्फे ॲड. कुर्डूकर यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here