मुंबई,दि.१२: बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील सासाराम/डेहरी येथून ‘अंधा कानून’ चित्रपटातील कथेची आठवण करून देणारी एक धक्कादायक आणि अवाक करणारी घटना समोर आली आहे. ज्या सरस्वती देवीच्या हत्येच्या आरोपाखाली तिचा पती अरुण मेहता, सासरे दिलीप मेहता आणि दीर गोविंद कुमार यांना तब्बल १२ वर्षे तुरुंगात राहावे लागले, ती सरस्वती देवी १२ वर्षांनंतर अचानक जिवंत सापडली आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
नेमके काय घडले होते?
ऑगस्ट २०१४ मध्ये डेहरी येथील बालरति बिगहा-दहाउर भागातील रहिवासी असलेली सरस्वती देवी अचानक घरून गायब झाली. ती तिच्या एका नात्यातील देवरासोबत निघून गेल्याचे सांगण्यात आले. तिच्या बेपत्ता होण्यानंतर २२ ऑगस्ट २०१४ रोजी खंडा गावातील एका कालव्यात (नहर) एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. सरस्वती देवीच्या भावाने या मृतदेहाची ओळख आपली बहीण सरस्वती देवी म्हणूनच केली.
त्यानंतर माहेरच्या लोकांनी हुंड्यासाठी हत्येचा आरोप करत पती अरुण मेहता, सासरे दिलीप मेहता, जेठ गोविंद कुमार यांच्यासह कुटुंबातील ८ लोकांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करून पती, सासरे आणि जेठ यांना अटक करून जेलमध्ये पाठवले.
झारखंडमध्ये नाव बदलून राहत होती सरस्वती देवी
पती आणि सासरचे नातेवाईक आपल्यावर न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना, सरस्वती देवी मात्र झारखंडमधील गढ़वा जिल्ह्यातील कांडी ठाण्याच्या लभारी गावात ‘कांति देवी’ असे नाव बदलून रट्टू सिंह नावाच्या व्यक्तीसोबत राहून नवीन संसार थाटून बसली होती. १२ वर्षांनंतर ती जिवंत असल्याची खबर सासरच्यांना लागली आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी झारखंडमध्ये जाऊन छापा टाकून सरस्वती देवीला ताब्यात घेतले आणि सासाराम न्यायालयात हजर केले.
मासूम मुलाला सोडले, संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले
जेव्हा सरस्वती देवी घर सोडून पळून गेली होती, तेव्हा तिचा मुलगा अतिशय लहान होता. आज तो २२ वर्षांचा झाला आहे. आईच्या या कृत्यामुळे मुलाचे बालपण पोरके झाले आणि सासरचे कुटुंब समाजात बदनाम होऊन उद्ध्वस्त झाले.
कुटुंबाचा प्रश्न: आमच्या आयुष्याचे वाया गेलेले १२ वर्षे कोण परत देणार?
या प्रकरणी निर्दोष असूनही वर्षांनुवर्षे तुरुंगाची हवा खावी लागलेल्या अरुण मेहता आणि त्यांच्या कुटुंबाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही कोणताही गुन्हा केला नव्हता, तरीही आमच्यावर हत्येचा खोटा आळ घालून आमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आले. आमच्या आयुष्याची ही मौल्यवान १२ वर्षे आणि झालेली मानहानी कोण भरून देणार?” असा सवाल सासरच्या मंडळींकडून उपस्थित केला जात आहे.
आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, २०१४ मध्ये कालव्यात मिळालेला तो मृतदेह नक्की कोणाचा होता आणि तपासात एवढी मोठी चूक कशी झाली? पोलीस या संपूर्ण प्रकरणाची नव्या दृष्टीकोनातून तपास करत आहेत.








