सोलापूर,दि.११: मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या आडोशाने जात प्रमाणपत्रे आणि जात पडताळणी समित्यांवर दबाव आणला जात असून, यामुळे राज्यातील बहुजन व ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे, असा थेट आरोप ओबीसी चळवळीतील नेते लक्ष्मण हाके यांनी केला. “ओबीसी आमचा डीएनए आहे,” असा जप करणाऱ्या राज्य सरकारने यावर आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
सोलापूर दौऱ्यावर आलेले हाके यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकार आणि मराठा आंदोलनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रतिनिधित्वाचा प्रश्न गंभीर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा संदर्भ देत हाके म्हणाले की, ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागांवर कुणबी-मराठा प्रमाणीकरणाच्या जोरावर उमेदवार निवडून आले आहेत. परिणामी, मूळचा मागास असलेला ओबीसी समाज राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित राहत आहे. या अन्यायाकडे सरकारने तातडीने लक्ष न दिल्यास ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल.
कंत्राटी नोकरभरती आणि प्रसाद लाड यांच्या कंपनीवर निशाणा
शिक्षकांसह इतर शासकीय नोकऱ्यांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी, व्हीजेएनटी आणि अनुसूचित जाती-जमातींना संधी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, “भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीलाच शासकीय कंत्राटे का मिळतात? आणि त्या कंत्राटांतून आरक्षित प्रवर्गातील किती तरुणांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला?” असा सवाल करत या सर्व करारांची सखोल चौकशी करून माहिती जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
“दहशतीच्या भाषेवर पुरोगामी गप्प का?”
मनोज जरांगे यांच्या भाषेवर तीव्र आक्षेप घेत हाके म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांबद्दल जाहीरपणे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्ये केली जात आहेत. या दहशतीच्या वातावरणावर सत्ताधारी आणि स्वतःला पुरोगामी म्हणवणारे नेते गप्प का आहेत? शासनाने कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता जात पडताळणी प्रक्रिया पारदर्शक ठेवावी, असे ते म्हणाले.
दलित-आंबेडकरी चळवळीला एकत्र येण्याचे आवाहन
आरक्षणाचा हा वाद केवळ एका घटकापुरता मर्यादित नसून, भविष्यात याचा फटका अनुसूचित जाती (SC) आणि जमातींनाही (ST) बसणार आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणना, भटक्या-विमुक्तांची स्वतंत्र नोंदणी आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी दलित व आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी एकत्र येऊन संघर्ष उभारण्याची गरज असल्याचे हाके यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला शंकर लिंगे, प्रशांत इंगळे, अर्जुन सलगर, पवन पाटील, शेखर बंगाळे, आप्पासाहेब व्हनमाने, प्रतिभा चव्हाण यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.








