सोलापूर,दि.२८: सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक ०५ सह संपूर्ण शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी व्यापक नसबंदी, रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि नियंत्रण कक्षाची स्थापना करावी, असा स्पष्ट मार्ग दाखवत भाजप नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य बिज्जू प्रधाने (Bijju Pradhane) यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे (Dr. Sachin Ombase) यांच्याकडे निवेदनाद्वारे जोरदार मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, सोलापुरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, शाळा, अंगणवाड्या, रुग्णालये परिसर व निवासी भागांत भटक्या कुत्र्यांचे टोळके मोकाटपणे वावरत आहेत. विशेषतः सकाळी फेरफटक्यासाठी बाहेर पडणारे नागरिक, दुचाकीस्वार, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर कुत्रे धावून जाणे व हल्ले करण्याच्या घटना रोजच घडत आहेत. कुत्र्यांच्या भीतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून शासकीय रुग्णालयांमध्ये रेबीज प्रतिबंधक लसीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

काही दिवसांपूर्वी भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका निष्पाप चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण सोलापूरसाठी अत्यंत वेदनादायी असून अशा प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचे बिज्जू प्रधाने यांनी स्पष्ट केले.
बिज्जू प्रधाने यांनी पालिकेला सादर केलेला ९ मुद्द्यांचा कृती आराखडा:
1. विशेष मोहीम: प्रभाग क्र. ०५ सह संपूर्ण शहरात भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी.
2. वैज्ञानिक नसबंदी (ABC): भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिक पद्धतीने नसबंदी करण्यात यावी.
3. रेबीज लसीकरण: सर्व भटक्या कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण तातडीने पूर्ण करावे.
4. कंट्रोल रूम व हेल्पलाइन: नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष (Control Room) आणि हेल्पलाइन सुरू करावी.
5. गर्दीच्या भागांवर भर: शाळा, अंगणवाड्या, उद्याने, रुग्णालये आणि बाजारपेठांना प्राधान्य देऊन मोहीम राबवावी.
6. तात्काळ पथक: कुत्र्यांच्या हल्ल्याची घटना घडताच संबंधित भागात तात्काळ विशेष पथक पाठवण्यात यावे.
7. कालबद्ध प्लॅन: पशुवैद्यकीय विभागातर्फे कालबद्ध कृती आराखडा जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.
8. जनजागृती: रेबीज प्रतिबंध आणि भटक्या प्राण्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी.
9. सार्वजनिक आढावा: मोहिमेचा नियमित आढावा घेऊन त्याची माहिती सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करावी.
नागरिकांच्या जिवाचे रक्षण करणे ही सोलापूर महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळवावे, अशी आग्रही मागणी बिज्जू प्रधाने यांनी केली आहे.








