Home महाराष्ट्र मुंबईकरांच्या मृत्यूवर भाजप आमदाराचे हसणे; राज ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघाती वार!

मुंबईकरांच्या मृत्यूवर भाजप आमदाराचे हसणे; राज ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघाती वार!

0

मुंबई,दि.४: Mumbai Rain Deaths: मुंबईत पावसाने थैमान घातले असतानाच लोकप्रतिनिधींच्या असंवेदनशीलतेचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेंबूरमध्ये अंगावर झाड कोसळून ११ वर्षांच्या निष्पाप बालकाचा झालेला मृत्यू आणि साकीनाकात उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख या तरुणाने गमावलेला जीव, या दोन अंगावर काटा आणणाऱ्या घटनांमुळे संपूर्ण मुंबई हळहळत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या गंभीर मुद्द्यावर सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मात्र, याच मुंबईकरांच्या मृत्यूच्या चर्चेदरम्यान भाजप आमदार अमित साटम सभागृहात ‘फिदीफिदी’ हसताना कॅमेऱ्यात कैद झाले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट फेसबुक पोस्ट करत भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला आहे.

‘भाजपला सत्तेचा माज आलाय’; राज ठाकरेंचा थेट हल्ला

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमधून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापासून ते राज्यातील नेत्यांपर्यंत सर्वांनाच फैलावर घेतले. “भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सत्तेचा माज आला आहे, अशी चर्चा देशभरात सुरू आहे. केंद्रातील नेत्यांच्या मनमानी कारभाराचा राग लोकांच्या मनात आधीपासूनच आहे, पण आता हा सत्तेच्या माजाचा संसर्ग महाराष्ट्रातही पसरला असून तुम्ही (देवेंद्र फडणवीस) तो पसरू देत आहात,” असा थेट आरोप राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्राच्या सुजाण आणि उमद्या राजकीय संस्कृतीची तुलना आता उत्तरेकडील मागास राज्यांशी होऊ लागल्याचे दुःखही त्यांनी व्यक्त केले.

‘लोकांच्या मृत्यूवर तुमचा आमदार हसतोय…’

अमित साटम यांच्या व्हिडिओचा दाखला देत राज ठाकरे पुढे म्हणाले, “तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूसारख्या संवेदनशील विषयावर फिदीफिदी हसतो आणि त्यावर तुम्ही साधी कारवाईही करत नाही. ‘अति सत्ता माणसाला पूर्णपणे भ्रष्ट करते’ (Absolute power corrupts absolutely) या म्हणीचा जिवंत दाखला आजचे भाजपचे नेते देत आहेत. कोणालाच कशाची खंत उरलेली नाही. तुम्ही यावर एक अवाक्षरही बोलत नसल्यामुळेच तुमचे लोक बेफाम झाले आहेत.”

फडणवीसांच्या ‘संवेदनशीलते’वर प्रश्नचिन्ह आणि जुन्या आठवणी

“देवेंद्र फडणवीस हे एक सुसंस्कृत आणि संवेदनशील नेते आहेत असं संपूर्ण महाराष्ट्राला आणि मलाही वाटत होतं. पण अशा घटनांवर जेव्हा तुम्ही मौन बाळगता, तेव्हा तुमच्या संवेदनशीलतेबद्दल शंका निर्माण होते.” — राज ठाकरे

आपल्या ३७ वर्षांच्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देत राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि प्रमोद महाजन यांच्या काळातील राजकीय मूल्यांची आठवण करून दिली. “पूर्वीच्या काळात स्वतःच्या पक्षाच्या नेत्याने चूक केली तरी ज्येष्ठ नेते त्यावर पांघरूण घालत नसत, म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणाचा देशात एक वेगळा आब होता,” असे राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या मौनावर उपस्थित केले प्रश्न

“आज ‘हा आपला माणूस आहे’ म्हणून तुम्ही त्यांच्या प्रत्येक चुकीला पाठीशी घालत आहात, याने महाराष्ट्राची आणि स्वतः तुमची प्रतिमा डागाळत आहे. तुमचे मंत्री रोज बेताल वक्तव्ये करत आहेत, नेते उघडपणे असंवेदनशीलता दाखवत आहेत, तरीही तुम्ही शांत का? तुमच्या या मौनाचे नेमके कारण काय?” असा रोकडा सवाल राज ठाकरेंनी विचारला. शेवटी, “देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती फक्त आपल्या लोकांच्या चुका पदरात घेणारा माणूस आहे, अशी तुमची प्रतिमा बनू देऊ नका. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही राजकीय संकेतांची अपेक्षा असते, तिचा अपेक्षाभंग करू नका; अन्यथा राजकारणात चुकीचे पायंडे पडतील,” असा कडक इशारावजा सल्लाही त्यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.