अलिबाग,दि.२: रायगड जिल्ह्यात पावसाने रौद्ररूप धारण केले असून गेल्या २४ तासांत तब्बल १०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अवघ्या साडे नऊ तासांत ५७ मिमी पाऊस कोसळल्याने संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. सततच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली असून इतरही प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे जिल्ह्यात महापुराचा धोका निर्माण झाला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
५ जुलैपर्यंत ‘रेड अलर्ट’; पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे
हवामान विभागाने ५ जुलैपर्यंत मुंबई आणि उपनगरांसह संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ घोषित केला आहे. पुढील काही दिवस अत्यंत तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सखल भागांत आधीच पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
पूरसदृश परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी तातडीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील अत्यंत संवेदनशील असलेल्या ७ तालुक्यांमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना गुरुवारी अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सुट्टी असलेले ७ तालुके: अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर.
कर्मचाऱ्यांना सवलत नाही: ही सुट्टी केवळ विद्यार्थ्यांसाठी असून सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित तालुक्यांमध्ये शाळा नियमित सुरू राहतील.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन:
परिस्थिती गंभीर असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तातडीने जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.








