सोलापूर,दि.३: दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर येथील बी.एड. (१९९३-९४) बॅचच्या विद्यार्थ्यांचा पहिला स्नेहमेळावा ३१ मे २०२६ रोजी जुळे सोलापूर येथील धनश्री मल्टीपर्पज हॉलमध्ये उत्साहात पार पडला.
या स्नेहमेळाव्याला संबंधित बॅचमधील ३८ विद्यार्थी आपल्या कुटुंबासह उपस्थित होते. कार्यक्रमात या बॅचमधील ११ सेवानिवृत्त सहकारी शिक्षकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांचे नाव, पत्ता आणि कौटुंबिक ओळख करून देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी विद्यार्थ्यांनी दिवंगत प्राचार्य राजशेखर कळसे सर, प्राध्यापक सुरेश करंदीकर, नुलकर मॅडम, पाटील मॅडम, जडे सर आणि माढेकर सर यांच्या आठवणी सांगून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. तसेच मेळाव्याला उपस्थित राहू न शकलेल्या हर्चेकर मॅडम व मोकाशी सर यांच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाला तत्कालीन प्राध्यापक डॉ. घाडगे सर, डॉ. विष्णू बामणे सर आणि डॉ. लता बामणे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. या गुरुजनांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व मार्गदर्शन करताना सांगितले की, “उतरत्या वयात मित्रांच्या सोबतीची नितांत गरज असते. आपण सर्वांनी एकत्र राहून एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे आणि एकमेकांना आधार द्यावा.” कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र मिळून स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी दीपक डोळस, श्रीधर चव्हाण, सुरेश भद्रशेट्टी, नागेश बंडे आणि अंबादास रेडे यांनी विशेष परिश्रम घेतले.








