अक्कलकोट,दि.२८: राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) संस्थापक-अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त मौजे बादोले बु. येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रासपचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महादेव जानकर यांना ५८ हजार रुपयांच्या नोटांचा हार घालून आणि पक्षनिधी सुपूर्द करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या सोहळ्याला सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे, रासपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव माऊली सलगर, महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजितकुमार पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल शेंडगे आणि सोलापूर शहराध्यक्ष सतीश बुजुरके यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच अक्कलकोट तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर, युवा नेते काकासाहेब पाटील, शिरवळचे माजी सरपंच बसवराज तानवडे, रासपचे अक्कलकोट तालुका संघटक गुणवंत लवटे, तालुका सरचिटणीस रविनाथ सलगरे, उपाध्यक्ष रेवणसिध्द शेरी, भिमाशंकर बंदिछोडे, बादोल्याचे माजी सरपंच बाजीराव खरात, गौरीशंकर गायकवाड, विठ्ठल खरात, बसवंत धायगोडे, शिवशंकर कत्ते, शांतकुमार सलगरे, अप्पुशा पाटील, रतनकुमार बिराजदार, मशिद शेख, लक्ष्मण धायगोडे, बडेसाब शेख, लाला नदाफ, पांडुरंग सलगरे, महेश सोलंकर, तानाजी सोलंकर, सिध्दाराम सलगरे, तुळशीराम माडकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपवर टीका आणि आंदोलनांचा उल्लेख
यावेळी सत्काराला उत्तर देताना महादेव जानकर म्हणाले, “दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आम्ही एनडीए (NDA) मध्ये सामील झालो होतो. मात्र, सध्या भाजप खऱ्या आणि निष्ठावंत नेत्यांना बाजूला सारून ‘नकली’ नेत्यांना जवळ करत आहे. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी दोन ते पाच लाख रुपयांचे अनुदान मिळावे, यासाठी मी, राजू शेट्टी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आंदोलन करत असताना आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये बच्चू कडू आणि मी आंदोलन केले, तेव्हाही सरकारने आम्हाला अटक केली. लोकशाहीत आंदोलन करणे हा गुन्हा आहे की काय, हेच आता समजेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी न राहणाऱ्या या सरकारला घरी पाठवण्यासाठी आम्ही दिवस-रात्र जनतेत फिरत आहोत.”
रासप ‘राष्ट्रीय पक्ष’ होण्याच्या उंबरठ्यावर
जानकर पुढे म्हणाले की, ज्यांना आम्ही सत्तेवर आणले, तेच आज आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाला आतापर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांत मान्यता मिळाली आहे. आणखी दोन राज्यांत मान्यता मिळाल्यास रासपला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून दर्जा मिळेल. हा पक्ष मोठा करण्यासाठी गोरगरीब जनता तन, मन आणि धनाने सहकार्य करत आहे, म्हणूनच पक्षाची घोडदौड सुरू आहे. आज बादोल्यात वाढदिवसानिमित्त पक्षनिधी म्हणून घातलेला नोटांचा हार हा राज्यभरातील ४० वा हार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
तानवडे परिवाराला पाठिंबा आणि कार्यकर्त्यांना आवाहन
अक्कलकोट तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना त्यांनी खंत व्यक्त केली की, “ज्या बाबासाहेब तानवडे घराण्याने या तालुक्यात भाजप वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी केले, त्याच कुटुंबातील तरुणाला तिकीट मिळत नाही, हे दुर्दैव आहे.” मात्र, आगामी काळ आपलाच असून तानवडे परिवाराच्या पाठीशी मी सदैव खंबीरपणे उभा राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
“महाराष्ट्रात सध्या परिवर्तनाची मोठी गरज असून राज्यात नक्कीच सत्ताबदल घडेल. आम्ही ज्या बाजूने राहू, तिकडेच सत्ता येईल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शेवटी, कार्यकर्त्यांना जनतेच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचे आवाहन करतानाच, तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनाही भविष्यात असेच सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडखुंबे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गुणवंत लवटे यांनी मानले.








