तापमानात आणखी वाढ होणार, हवामान तज्ज्ञांचा इशारा 

0

मुंबई,दि.19: तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा हवामान तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. सोलापूरमध्ये काल (दि.18) 33.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी (दि.16) सोलापुरात 35 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील अनेक भागात तापमान वाढले आहे. पहाटे सकाळी थंड हवा असली तरी दिवसभर तापमानाची तीव्रता जाणवत आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता जाणवू लागली आहे.

हवामानातील बदल नागरिकांना जाणवत आहे. थंडी कमी झाली आहे. पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत असली तरीही दिवसभर उकाडा जाणवत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक घरातील कुलर, एसी सुरू करण्यात आले आहेत. अशातच तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता असून उन्हाची तीव्रता अधिक वाढणार आहे. 

हवामान तज्ज्ञांनी पुढील काही दिवस तापमान आणखी वाढेल असा इशारा दिल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.सोलापूर शहरासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान 30°C पेक्षा जास्त नोंदवले जात आहे. दुपारच्या वेळी उन्हाचे चटके अधिक जाणवू लागले असून रस्त्यांवर वर्दळ कमी होताना दिसत आहे. विशेषतः विदर्भात काही ठिकाणी तापमान 35°C च्या पुढे गेले आहे. हवामान विभागानुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे हा बदल दिसत आहे.

ज्येष्ठ हवामानतज्ज्ञांच्या माहितीनुसार विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या सर्व भागांत दिवस आणि रात्रीचे तापमान तुलनेने वाढलेले राहण्याची शक्यता आहे. उष्णतेमुळे दुपारच्या वेळी बाहेर पडताना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पाणी अधिक प्रमाणात पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि शक्यतो कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here