मुंबई,दि.१८: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघाताबाबत मोठा दावा केला आहे. २८ जानेवारी २०२६ ला विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर या विमान अपघाताबाबत अनेकजण शंका उपस्थित करत आहेत. रोहित पवार यांनी यापूर्वी दोनदा पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी शंका उपस्थित करत या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली होती.
रोहित पवार यांनी दोन आठवड्यांमध्ये तिसरी मोठी पत्रकार परिषद घेऊन या अपघाताबद्दलच्या शंका जाहीरपणे बोलून दाखवल्या. विमानातील ब्लॅक बॉक्स, इंधनाचे प्रमाण, विमान कंपनीचा गैरकारभार, विमान कंपनीच्या मलकाला वाचवण्याचा प्रयत्न अशा अनेक विषयांवर रोहित पवारांनी नव्याने अगदी प्रेझेंटेशनसहीत प्रश्न उपस्थित केले. मात्र त्यावेळी त्यांनी या अपघातामागील मास्टर माईंड कोण असेल याबद्दल सूचक विधान केलं आहे.
विमान अपघाताच्या चौकशीमध्ये अनेक धागेदोरे कशाप्रकारे हा अपघात सामान्य नसल्याचे संकेत देत आहेत याबद्दल रोहित पवार यांनी सुरुवातीला भाष्य केलं. पुढे बोलताना रोहित पवारांनी तांत्रिक बाबांवरील माहिती आणि तपशील सादर केला. रोहित पवार यांनी या अपघातासंदर्भात त्यांना पडलेले प्रश्न आणि परिस्थितीजन्य शंका बोलून दाखवल्यानंतर अपघातासाठी विमान कंपनी, सरकारी अधिकारीही तितकेच जबाबदार असल्याचं म्हटलं.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर विचारलेल्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, मला विलीनीकरणावर बोलायचं नव्हते. पण जर हे दोन पक्ष एकत्र आले असते आणि अजितदादांची इच्छा दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची होती. भावनिक दृष्टीने ते विचार करत होते. राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते तर महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद डॉ. अमोल कोल्हे यांना देण्यात आले असते. दुसऱ्या गटातील लोकांना विलीनीकरणावर बोलायला भारी वाटते. त्यांच्या पत्रकार परिषद पाहिल्या तर त्यांना विलीनीकरणावर बोलायला फार आवडते. आम्हीच अजितदादांचा अपघात की घातपात या विषयावर बोलतोय. त्यामुळे त्यांना ज्या विषयावर बोलायचे आहे त्यावर मी आज बोलले पाहिजे असं वाटत नाही असं त्यांनी सांगितले.
अजित पवारांच्या विमानासंदर्भात झालेला घातपात हा राजकीय हेतूने झाला नसेल ना? असा सवाल रोहित पवारांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवारांनी सदर अपघाताबद्दल दोनच राजकीय शक्यता असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. या प्रकरणामध्ये राजकारण आहे की नाही हे ठामपणे सांगता येणार नसल्याचं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार म्हणाले, पण असेलच तर त्याला दोनच अँगल असतील हे नमूद करायला रोहित पवार विसरले नाहीत. “यात राजकारण आहे की नाही माहिती नाही. पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, इतकेच माझे म्हणणं आहे. लोक मला विचारत आहेत की राजकीय अँगल असेल तर कोणता? तर माझ्या मते यात दोनच राजकीय अँगल असू शकतात. एक अँगल आम्ही सर्व एनडीएबरोबर गेलो तर एक कुठला तरी गट दुखावणार आणि आम्ही एनडीएबरोबर न जाता दादाच (अजित पवारच) एनडीएमधून बाहेर आले, रस्त्यावरील लढाई लोकांमध्ये राहून लढले तर दुसरा गट दुखावणार. या दोन पैकी एक संभावना राजकीय दृष्टीकोनातून असू शकते असं माझं मत आहे,” असं रोहित पवार म्हणाले. एवढ्यावरच न थांबता, “यापैकी कशालाही विरोध असलेल्या गटाकडून तर हे सारं झालं नाही ना?” अशी शंका रोहित पवारांनी बोलून दाखवली.








