सोलापूर,दि.21: भाजपा महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकीत प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राज्यातील नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राज्यातील 288 पैकी 129 नगरपरिषदा/नगरपालिका भाजपाने जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं उत्तम कामगिरी करत 54 जागा जिंकल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 33 नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत. महायुतीने एकत्रितपणे 288 पैकी 200 हून अधिक जागा जिंकल्या आहेत.
श्रीवर्धन नगरपालिकेत शिवसेनेचे (ठाकरे गट) अतुल चौगुले नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले आहेत. श्रीवर्धन नगरपालिकेवर गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र यावेळी श्रीवर्धन नगरपालिकेतील चित्र बदलले आहे. या निवडणुकीत विजयी झालेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार अतुल चौगुले मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे निकालानंतर लगेच शिंदेसेनेने उद्धवसेनेला धक्का दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना मतदारांचे आभार मानले आहेत. शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना अपेक्षित यश मिळाले नाही.








