जळगाव,दि.७: पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील कॅामन मॅनचे दर्शन झाले आहे. एकनाथ शिंदे हे जमिनीवरील नेते आहेत. अनेकांनी त्यांच्या साधेपणाचा अनुभव घेतला आहे. शिंदे हे कोणताही बडेजाव न करता अनेकांना मदत करतात हे अनेकांना माहीत आहे. अशातच काल पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यातील माणुसकीचे दर्शन झाले. शिंदे हे काल जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विलंब न करता एका गरजू महिलेला मदत केली.
जळगाव जिल्ह्यातील शहापूर येथील किडनीविकारग्रस्त महिला रुग्णाला शिंदे यांनी मदत केली आहे. शहापूर येथील किडनीविकारग्रस्त शीतल आनंद बोर्डे (३५) या महिलेला उपचारांसाठी मुंबईला जायचे होते. या किडनीविकारग्रस्त लाडक्या बहिणीला सोबत विमानात घेऊन शिंदे मुंबईकडे रवाना झाले.
शीतल बोर्डे या महिलेची किडनी निकामी असल्यामुळे गेल्या आठ वर्षापासून डायलिसीस सुरू आहे. किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी त्यांना तातडीने मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये जायचे होते. शीतल यांच्या कुटुंबीयांनी किडनीदानासाठी अर्ज केलेला होता. किडनी डोनर उपलब्ध झाल्याने त्यांना मुंबईला शुक्रवारी रात्री १० वाजेपर्यंत पोहोचणे आवश्यक होते.

शीतल व त्यांचे पती आनंद बोर्डे हे जळगाव विमानतळावर दाखल झाले. मात्र या दरम्यान त्यांचे विमान सुटल्याने ते निराश झाले. ही बाब एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी ट्रान्सप्लांटसाठी मुंबई निघालेल्या जळगावच्या रुग्ण महिलेला स्वत:च्या विमानात घेऊन जात शिंदे यांनी कॉमन मॅनचे दर्शन घडवलं.
कुठल्याही प्रकारचे कारण न देता एकनाथ शिंदे यांनी गरजू महिलेला तात्काळ स्वतःच्या विमानात जागा उपलब्ध करून मुंबईला आणलं. विशेष म्हणजे मुंबईला उतरल्यानंतर रुग्णालयापर्यंत या महिलेला रुग्णवाहिका सुद्धा तयार ठेवण्यात आली होती.