निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे लोकसभा निवडणुकीबाबत मोठे भाकीत

0

नवी दिल्ली,दि.9: आगामी लोकसभा निवडणुकीत (2024) भाजपा पश्चिम बंगालमध्ये नंबर-1 पक्ष बनू शकतो, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले की, भाजपाने गेल्या काही वर्षांत दक्षिण आणि पूर्व भारतात आपले अस्तित्व वाढवण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. यावेळी त्याचा फायदा पक्षाला मिळू शकतो. बंगालमध्ये भाजपा नंबर 1 पक्ष म्हणून उदयास येईल, असे मला वाटते, असे प्रशांत किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर यांचे भाकीत

लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर यांचे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे, कारण त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना 2021 च्या बंगाल निवडणुकीच्या प्रचारात मदत केली होती. त्यामुळे ममता दणदणीत विजय मिळवून सत्तेत परतल्या. भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघेही अजिंक्य नाहीत यावर भर देत प्रशांत किशोर म्हणाले की, विरोधकांनी संधी गमावली आहेत.

भाजपाची मजबूत पकड आहे

प्रशांत किशोर यांनी अनेक मुलाखतींमध्ये म्हटले आहे की, भाजप देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात बहुतांश जागा जिंकतो आणि पूर्व आणि दक्षिण पट्ट्यातील अपयश लपवण्याचा प्रयत्न करतो. आता प्रशांत किशोर म्हणाले की, विरोधी पक्ष, विशेषतः काँग्रेस, उत्तर आणि पश्चिमेतील त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपा किमान 100 जागा गमावतील याची खात्री करून घेतली तरच आगामी निवडणुकीत विरोधी पक्षांना दिलासा मिळू शकतो. पण असे होणार नाही. या भागात भाजपा आपली पकड कायम ठेवण्यास सक्षम असल्याचे ते म्हणाले. 

370 जागा जिंकण्याची शक्यता नाही

प्रशांत किशोर म्हणाले की, तेलंगणात भाजप पहिला किंवा दुसरा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो, ही मोठी गोष्ट आहे. यासोबतच प्रशांत किशोर म्हणाले की, ओडिशात भाजप नंबर-1 पक्ष बनेल. तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि केरळमध्ये लोकसभेच्या एकूण 204 जागा आहेत, परंतु 2014 किंवा 2019 मध्ये भाजपला या सर्व राज्यांमध्ये 50 जागाही जिंकता आल्या नाहीत. 2014 मध्ये या राज्यांमध्ये 29 जागा आणि 2019 मध्ये 47 जागा जिंकल्या होत्या. देशात लोकसभेच्या एकूण 543 जागा असून 19 एप्रिलपासून निवडणुका सुरू होत आहेत. तथापि, प्रशांत किशोर यांनी जोर दिला की भाजपला त्यांच्या लक्ष्यानुसार 370 जागा जिंकण्याची शक्यता नाही. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here