शृंगार गौरी ज्ञानवापी मशीद प्रकरणी हिंदू पक्षाच्या वकिलाचा मोठा दावा

0

नवी दिल्ली,दि.26: शृंगार गौरी ज्ञानवापी मशीद प्रकरणात (Shringar Gauri-Gyanvapi Case) हिंदू पक्षाच्या वकिलाने मोठा दावा केला आहे. ज्ञानवापी प्रकरणातील ASI अहवालाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. अहवालाचा हवाला देत हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी दावा केला आहे की, ज्ञानवापी असलेल्या ठिकाणी मंदिर असल्याचे पुरावे समोर आले आहेत.

विष्णू जैन यांनी म्हटले आहे की, पश्चिमेकडील भिंत हे सिद्ध करते की मशीद हिंदू मंदिराचा भाग आहे. वकिलाने सांगितले की, 17 व्या शतकात हिंदू मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली होती. ते म्हणाले की, अहवालात असे म्हटले आहे की मशिदीपूर्वी त्या ठिकाणी हिंदू मंदिर अस्तित्वात होते. मात्र, एएसआयकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती मातीखाली गाडलेल्या सापडल्या

विष्णू जैन म्हणाले की, मशीद बांधण्यासाठी मंदिराच्या खांबांचा वापर करण्यात आला. तळघर S2 मध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती मातीखाली गाडलेल्या सापडल्या आहेत. ते म्हणाले की अशी 32 ठिकाणे आहेत जी जुन्या हिंदू मंदिरांची आहेत. पूर्वी हिंदू मंदिराचा काही भाग वापरून मशीद बांधण्यात आली होती. देवनागरी, ग्रंथ, तेलगू आणि कन्नड लिपी भिंतींवर दिसतात. 

न्यायालयाच्या आदेशानुसार हा अहवाल सादर

वाराणसी जिल्हा न्यायालयाने बुधवारी ज्ञानवापी मशीद संकुलाचा सर्वेक्षण अहवाल सर्व पक्षकारांना सोपवण्याचे आदेश दिले होते. हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव यांनी सांगितले की, जिल्हा न्यायाधीश ए के विश्वेश यांनी आपल्या आदेशात ज्ञानवापी कॉम्प्लेक्सचा सर्व्हे अहवाल सर्व पक्षकारांना सोपवावा, असे म्हटले आहे.

सर्वेक्षणाचा अहवाल केवळ पक्षकारांकडेच राहावा, सार्वजनिक करू नये, अशी मागणी या वेळी मुस्लिम पक्षाने जिल्हा न्यायाधीशांसमोर केली. न्यायालयाच्या आदेशानंतर या अहवालाची प्रत वकील विष्णू शंकर जैन यांना देण्यात आली आहे. 

न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण

वकिल आयुक्त आणि वाराणसी न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त केलेल्या पथकाने ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण केले होते. ज्ञानवापी मशीद प्रत्यक्षात मंदिर पाडून बांधल्याचा हिंदू पक्षाचा दावा तपासण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. वाराणसीच्या दिवाणी न्यायालयाने या जागेचे सर्वेक्षण आणि व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश दिले होते. मुस्लिम पक्षाने मशिदीच्या सर्वेक्षणाला विरोध केला होता आणि न्यायालयात अर्जही दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत सर्वेक्षणाचे आदेश दिले. शिवलिंग सापडल्याचा दावा समोर आल्यानंतर न्यायालयाने मशिदीचा वाजुखाना सील करण्याचे आदेश दिले होते.  

विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा

गेल्या वर्षी न्यायालयात हिंदू महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने दावा केला होता की, मशिदीच्या आवारात तलावात शिवलिंग सापडले आहे. वकील सुभाष नंदन चतुर्वेदी म्हणाले होते की, तलावाचा वापर शुद्धीकरणासाठी केला जात होता. प्रतिष्ठित काशी विश्वनाथ मंदिराजवळ ज्ञानवापी मशीद आहे हे उल्लेखनीय आहे. स्थानिक न्यायालय महिलांच्या एका गटाच्या याचिकेवर सुनावणी करत आहे, ज्याच्या बाहेरील भिंतींवरील मूर्तींसमोर दररोज प्रार्थना करण्याची परवानगी मागितली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here