वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन, भटक्या कुत्र्यांनी केला होता हल्ला

0

अहमदाबाद,दि.23: गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघ बकरी चहा (Wagh Bakri Tea) समूहचे कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचे निधन झाले आहे. ते 49 वर्षांचे होते. पराग हे देसाई कुटुंबातील चौथ्या पिढीतील सदस्य होते. नारनदास देसाई यांनी 1892 मध्ये स्थापन केलेल्या कंपनीचा कारभार ते मागील काही वर्षांपासून पाहत होते. प्राप्त माहितीनुसार, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून जीव वाचवताना ते पडले व त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर ते दवाखान्यात दाखल होते.

त्यांच्या निधनामुळे उद्योगजगत आणि सामाजिक क्षेत्रासही धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी विदिशा आणि बेटी परीशा असा परिवार आहे. मागील आठवड्यात त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना ब्रेन हेमरेज झाला होता आणि ते रुग्णालयात होते. अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.

भटक्या कुत्र्यांनी केला हल्ला

पराग देसाई नेहमी मॉर्निंग वॉकला जातात. 15 ऑक्टोबर रोजी ते नेहमीप्रमाणे इस्कॉन अंबली रोडवर मॉर्निग वॉकसाठी गेले होते. यावेळी भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यांच्या हल्लापासून वाचण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाय घसरला. त्यात ते खाली पडून जबर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या मेंदूतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता.

यावेळी त्यांना अहमदाबादच्या प्रल्हादनगर भागातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. 24 तासांनंतर त्यांची प्रकृती बिघडू लागल्याने, त्यांना हेबतपूर रोडवरील दुसऱ्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. सात दिवस व्हेंटिलेटरवर असणाऱ्या देसाई यांची प्रकृती रविवारी उशिरा फारच बिघडली व त्यानंतर त्यांचे निधन झाले.

कोण होते पराग देसाई? | Parag Desai

पराग आणि त्यांचा चुलत भाऊ पारस देसाई हे १९९० च्या दशकात कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. अमेरिकेतील लॉंग आयलँड विद्यापीठातून एमबीए केलेले पराग हे वाघ बकरी टी ग्रुपच्या संचालक मंडळातील दोन कार्यकारी संचालकांपैकी एक होते. ते कंपनीच्या विक्री, मार्केटिंग आणि निर्यातीचे नेतृत्व करत होते.

३० वर्षांहून अधिक अनुभव गाठीशी असणाऱ्या पराग यांच्या कार्यकाळात कंपनीची नेटवर्थ ही १५०० कोटींहून पुढे पोहोचली होती. , देसाई हे इतर संस्थांसह भारतीय उद्योग महासंघाचा (CII) भाग होते. पराग यांच्या निधनानंतर काँग्रेस खासदार, शक्तीसिंह गोहिल यांनी X वर श्रद्धांजली वाहिली आहे तर नेटकऱ्यांनी सुद्धा देसाई यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here