Solapur Crime: हॅाटेलसमोर हवेत गोळीबार; पाच जणांना अटक

0

सोलापूर,दि.२३: Solapur Crime: सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे हॉटेल प्रशांत बियर बार आणि परमिट रूमसमोर मध्यधुंद अवस्थेत भांडणातून एकाने स्वत:जवळील असलेल्या रिव्हॉल्व्हर मधून हवेत पाच वेळा गोळीबार करून दहशत निर्माण केल्याने याप्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यावेळी रिव्हॉल्व्हर सह ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री सव्वा एकच्या दरम्यान घटली.

सिद्धाराम चंद्रकांत जानकर, नागेश बहिरप्पा साबळे, शरणाप्पा हनुमंत पाटील (तिघेजण रा. चिंचपूर ता द सोलापूर) शिवशरण खंडाप्पा दूधभाते, अंकुश आमसिद्ध घोडके (दोघे रा. टाकळी ता द सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीची नांवे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी वरील पाचही जण येथील हॉटेल प्रशांत बियर बार परमिट रूममध्ये जेवण करायला बसले होते. यावेळी त्यांनी मद्यप्राशन केले होते. अचानक काही कारणावरून यांच्यात भांडण होऊ लागले. यावेळी हॉटेल मालकांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. बाहेर आल्यावरही यांच्यात भांडणे सुरूच होते एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले.

यावेळी सिद्धाराम चंद्रकांत जानकर यांनी स्वत:जवळील रिव्हाल्वरने हवेमध्ये पाचवेळा गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी पोलीस पथक तिथे पाठविले. पोलीस आल्यानंतर सुद्धा पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता त्यांनी भांडण आपापसात सुरू ठेवले व हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मानवी जीवितास धोका निर्माण होईल हे माहीत असताना देखील पाच राऊंड फायर करून भीतीचे वातावरण निर्माण केल्याबद्दल पाचही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले हे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here