Gujarat Election Results 2022: भाजपा गुजरातमध्ये रेकॉर्ड तोडणार, ऐतिहासिक विजयाचे संकेत

Gujarat Election Results 2022 | गुजरातमध्ये भाजपने १५० च्या आसपास जागा जिंकल्यास हा ऐतिहासिक विजय ठरेल

0

अहमदाबाद,दि.८: Gujarat Election Results 2022: भाजपा गुजरातमध्ये रेकॉर्ड तोडणार असल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे ऐतिहासिक विजयाचे संकेत मिळत आहेत. गुजरात मध्ये भाजपा सातव्यांदा प्रचंड बहुमताने सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. त्यासाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्याच तासात भाजपने काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला धूळ चारत मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

Gujarat Election Results 2022 | गुजरातमध्ये भाजपा रेकॉर्ड तोडणार

यापूर्वी भाजपने गुजरात विधानसभेत सर्वाधिक १२७ जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदा भाजपकडून हा विक्रम मोडीत काढला जाऊन ऐतिहासिक विजय मिळवला जाण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभेच्या १८२ जागांचे प्राथमिक कल हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपने १५३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार १९ जागांवर, आप ७ आणि अपक्ष उमेदवार ३ जागेवर आघाडीवर आहे.

गुजरात एक्झिट पोलमध्ये भाजपाला एकतर्फी विजय मिळणार असल्याचा अंदाज

यापूर्वी एक्झिट पोल्सनी गुजरातमध्ये भाजपला एकतर्फी विजय मिळेल, असा अंदाज वर्तविला होता. गुजरातमध्ये हा अंदाज तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. किंबहुना एक्झिट पोल्समध्ये वर्तविलेल्या अंदाजापेक्षा भाजपला जास्त यश मिळण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे गुजरातमध्ये भाजप ऐतिहासिक विजय मिळवू शकतो, असे संकेत सुरुवातीच्या काही तासांमध्ये दिसत आहेत. मात्र, अद्याप मतमोजणी सुरु होऊन तासभरही उलटलेला नाही. त्यामुळे आगामी काळात हे चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याची परिस्थिती पाहता गुजरातमध्ये भाजप अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टरवर मात करून पुन्हा सत्ता प्रस्थापित करेल, असे चित्र दिसत आहे.

गुजरातमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय ठरणार

गुजरातमध्ये भाजपने १५० च्या आसपास जागा जिंकल्यास हा ऐतिहासिक विजय ठरेल. यापूर्वी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाही भाजपला १२७ जागांचा टप्पा ओलांडला नव्हता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजप हा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास हा भाजपसाठी मोठा दिलास ठरेल. याशिवाय, गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट होईल. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये भाजप ही आघाडी टिकवून ठेवणार का, हे पाहावे लागेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here