नवी दिल्ली,दि.24: काँग्रेसचे युट्यूब चॅनेल डिलीट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारने अनेक युट्युब चॅनेलवर कारवाई केली आहे. अफवा पसरवल्या जाणाऱ्या अनेक चॅनेलवर कारवाई करण्यात आली आहे. मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी देशविरोधी अफवा पसरविणारे युट्यूब चॅनेल बंद केले होते. आज काँग्रेसचा युट्यूब चॅनेल डिलीट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारने बॅन केलेल्या चॅनेलमध्ये काँग्रेसच्या या चॅनेलचे नाव नव्हते.
काँग्रेसचा युट्यूब चॅनल डिलीट झाल्याची माहिती काँग्रेसनेच ट्विटरवर दिली आहे. आमचा YouTube चॅनेल – ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ हटवण्यात आला आहे. यावर आम्ही काम करत आहोत. तसेच Google/YouTube टीमच्या संपर्कात आहोत. यामागे काही तांत्रिक बिघाड की अन्य काही घातपात आहे याचीही चौकशी केली जात आहे, लवकरच पुन्हा लाईव्ह येण्याची अपेक्षा आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
INC सोशल मीडिया टीमने हे ट्विट केले आहे.
चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी केंद्र सरकारने यूट्यूब चॅनल्सवर कडक कारवाई केली आहे. कथितपणे अपप्रचार करणाऱ्या 8 यूट्यूब चॅनेलवर केंद्राने बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेल्या 8 चॅनेल्सपैकी 7 भारतीय आणि 1 चॅनल पाकिस्तानी आहे. केंद्राने या कारवाईमागे राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेबाबत अपप्रचार करणाऱ्या यूट्यूब चॅनेलवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत. आयटी नियम-2021 अंतर्गत हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, डिसेंबर 2021 पासून आतापर्यंत 102 यूट्यूब आधारित न्यूज-चॅनेल आणि सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय आयटी मंत्री अनुराग ठाकूर यांनी जुलैमध्ये लोकसभेत सांगितले की 2021-22 मध्ये 78 YouTube-आधारित न्यूज-चॅनेलवर बंदी घालण्यात आली होती. तसेच, 560 YouTube लिंक ब्लॉक करण्यात आल्या होत्या.