Har Har Mahadev | Zee मराठीचा हर हर महादेव चित्रपट प्रदर्शनासंदर्भात मोठा निर्णय

Har Har Mahadev: हर हर महादेव चित्रपटातील वादग्रस्त दृश्य आणि प्रसंगाबाबत आक्षेप

0

मुंबई,दि.15: Zee मराठीने हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपट प्रदर्शनासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. हर हर महादेव चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचा इतिहास दाखवला आहे असा आरोप करण्यात आला होता. चित्रपटाला अनेक ठिकाणी विरोध करण्यात आला होता. सोलापुरात संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) चित्रपट बंद पाडला होता. Zee मराठी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

Har Har Mahadev चित्रपटातील वादग्रस्त दृश्य आणि प्रसंग वगळण्याचा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा Har Har Mahadev हा चित्रपट झी मराठी वाहिनीवर 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपट प्रदर्शनास संभाजी ब्रिगेडसह माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि राज्यभरात अनेक स्तरांतून विरोध झाला होता. त्यामुळे हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, असे पत्र देखील संभाजीराजे छत्रपती यांनी झी स्टुडिओच्या व्यवस्थापनास दिले होते. आता झी मराठीनं या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी एक मोठा निर्णय घेतला आहे. चित्रपटातील वादग्रस्त दृश्य आणि प्रसंग वगळण्याचा निर्णय झी मराठीनं घेतला असल्याचं संभाजी ब्रिगेडकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Har Har Mahadev

संभाजी ब्रिगेडच्या पाठपुराव्यास यश

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी आणि सहकाऱ्यांनी हर हर महादेव चित्रपटाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ‘सेन्सर बोर्ड’ यांच्याकडे सुद्धा तक्रार केली होती. तसेच आक्षेपार्ह प्रसंगांबाबत वकिलांमार्फत नोटीस सुद्धा पाठवण्यात आली होती. संभाजी ब्रिगेडच्या या पाठपुराव्यास यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. चित्रपटातील सर्व वादग्रस्त प्रसंग वगळण्याचं ZEE स्टुडिओ आणि हर हर महादेव चित्रपटातील टीमने मान्य केलं आहे. याबाबतचं पत्रही संभाजी ब्रिगेडला झी कडून देण्यात आलं आहे.

चुकीचा आणि आक्षेपार्ह इतिहास मांडला होता

हर हर महादेव चित्रपटातील वादग्रस्त दृश्य आणि प्रसंगाबाबत संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, सरदार कृष्णाजी बांदल यांच्याबाबत अतिशय चुकीचा आणि आक्षेपार्ह इतिहास मांडला होता. या विरोधात संभाजी ब्रिगेडने सोलापूर, पुण्यातील चित्रपटगृह बंद पाडली होती. तसेच आक्रमक भूमिका सुद्धा घेतली होती.

ZEE स्टुडिओच्या मुंबईतील कार्यालयात 14 डिसेंबर 2022 रोजी संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे आणि सहकार्याने याबाबत भूमिका घेतली होती. म्हणूनच झी स्टुडिओ आणि संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेत समर्थन देऊन वादग्रस्त प्रसंग वगळण्याचा निर्णय घेतला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here