सोलापूर,दि.29: दहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील सभेत वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी मिलिटरी सैनिकांच्या गणवेशासाठी येथील कापड वापरण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता केली का असा सवाल प्रियदर्शिनी प्रबोधन मंचचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते हेमू चंदेले यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
दहा वर्षांपूर्वी मोदी यांनी सोलापूरच्या सभेमध्ये मिलिटरी कापड घेण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. ते अद्याप पूर्ण केले नाही. त्याची पूर्तता कधी करणार असा सवाल उपस्थित करत चंदेले यांनी काँग्रेसच्या साठ वर्षांतील सत्ता कार्यकाळातील विविध विकासकामांवर प्रकाश टाकला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काय केले असा प्रश्न भाजपकडून केला जातो.
मात्र, सोलापूर शहराच्या विकासाचा पाया शिंदे यांनीच रचला आहे. त्यांनी जर उजनी जलवाहिनी आणली नसती तर सोलापूरकरांचे पाण्यासाठी मोठे हाल झाले असते. याउलट सोलापूरच्या चादर, हातमाग उद्योगाला ऊर्जा देण्यासाठी येथील कापड मिलिटरी सैनिकांच्या गणवेशासाठी वापरण्यात येईल, असे आश्वासन मोदी यांनी दिले होते. मात्र, ती नुसतीच घोषणा ठरली, असेही ते म्हणाले.
दरम्यानच्या काळात 2014मध्ये भाजपचे सरकार येऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. काँग्रेसने जर काहीच केले नसते तर पंतप्रधान मोदी हे परदेशात निधीसाठी फिरले असते. काँग्रेसने आर्थिक विकास केल्यामुळे ती वेळ आली नाही. अन्नसुरक्षा योजना, राजीव गांधी आरोग्य योजना, मनरेगा, पंतप्रधान सडक योजना यासारख्या विविध योजनांद्वारे काँग्रेसनेच देशाचा कायापालट केला. सर्वकाही काँग्रेसने केले.
भाजपने केवळ आयत्या बिळात नागोबा अशी भूमिका वठवली असल्याची टीका यावेळी चंदेले यांनी केली. तसेच प्रणिती शिंदे यांनी पंधरा वर्षांत आमदार म्हणून शहरातील कामगार, कष्टकरी आणि सोलापूरच्या शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला, कामे केली.
त्यामुळे त्या निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. यासाठी प्रियदर्शिनी विचार मंचचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे प्रणिती यांच्या प्रचारासाठी घरोघरी फिरून काँग्रेसने केलेल्या कामाची माहिती देत असल्याचेही चंदेले यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस अमृतदत्त चिनी आदी उपस्थित होते.
काँग्रेसने सर्व क्षेत्रात क्रांती केली
आपल्या मागील साठ वर्षांच्या सत्ता काळात काँग्रेसने मोठमोठ्या विकास योजना यशस्वी केल्या, तळागाळापर्यंत पोहोचवल्या. भारत स्वतंत्र होतानाच्या काळात देशाची लोकसंख्या 33 कोटी होती. मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. अशा परिस्थितीतून वाटचाल करीत काँग्रेसने सर्व मूलभूत सुविधा देत कृषी, विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडविली. सर्व क्षेत्रात चौफेर विकास केला असल्याचे ज्येष्ठ नेते हेमू चंदेले यांनी सांगितले.
‘सिध्देश्वर’ची चिमणी पाडून काय मिळविले?
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून सत्ताधाऱ्यांनी काय मिळविले? असा सवाल ज्येष्ठ नेते हेमू चंदेले यांनी केला. तसेच विमानसेवेला अनेक अडथळे असताना केवळ चिमणीच का पाडण्यात आली. यातून साध्य काय झाले, विमानसेवा सुरू झाली का? असे अनेक प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
आठवतंय का? सोलापूरकर 2014
सोशल मिडीयावर मिम्स धुमाकूळ घालत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात 2014 ला अनेक आश्वासने दिली होती. आठवतंय का? सोलापूरकर 2014 मिल्ट्री चे ड्रेस इथून शिवून घेऊ म्हणाले होते घेतले का…? हे फक्त येणार फेकणार आणि जाणार, मोदी कि गारंटी
आठवतंय का ? सोलापूरकर 2014 यंत्रमाग पॅकेज देतो म्हणाले होते दिले का…?
हे फक्त येणार फेकणार आणि जाणार, मोदी कि गारंटी