मुंबई,दि.६: Vinayak Raut On Devendra Fadnavis: ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. कोकणातील बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेत ( ठाकरे गट ) आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. बारसू प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणारे हे बंदी घातलेल्या ‘ग्रीनपीस’ संघटनेशी संबंधित असून त्यांना या संघटनेचा पैसा येतो, असा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत शुक्रवारी केला होता. याला आता खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
“राज्य सरकारकडून विलंब झाल्याने कोकणातील तेलशुद्धीकरण प्रकल्पात गुंतवणूक करणारी सौदी अरेबियाची ‘अरामको’ ही कंपनी पाकिस्तानात गेली आहे. तरीही केंद्र सरकारच्या मालकीच्या तेल कंपन्यांच्या मदतीने कोकणात बारसू येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प केला जाईल,” अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“सरकारला तेलशुद्धीकरण प्रकल्प गावकऱ्यांना डावलून करायचा नाही. ज्यांना देशाचा विकास नको आहे, असे लोक या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. ही तिच माणसे आहेत की जी ‘आरे’, ‘ बुलेट ट्रेन’, या प्रकल्पांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होती. काही माणसे ‘नर्मदा’ आंदोलनात ही सहभागी होती. ही माणसे वारंवार बंगळुरूमध्ये जातात. त्यांच्या बँक खात्यावर भारतात बंदी घातलेल्या ‘ग्रीनपीस’ या संघटनेकडून पैसे येतात,” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी | Vinayak Raut On Devendra Fadnavis
यावर विनायक राऊत यांनी सडकून टीका केली आहे. “अरामको’ कंपनीची दलाली घेतल्यासारखं देवेंद्र फडणवीसांनी व्यक्तव्य केलं आहे. त्याचा मी धिक्कार करतो. हिंमत असेल तर गृहमंत्रीपदाचा वापर करून बारसूमध्ये आंदोलन करणाऱ्या कोणत्या व्यक्तीला बंगळुरूतून पैसे मिळतात, त्याचं नाव जाहीर करा. जर, हिंमत नसेल, तर विधानपरिषदेत वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा राजीनामा द्यावा,” असे आव्हान विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.