इटावा,दि.५: इटावा येथील BJP (भाजप) खासदार रामशंकर कठेरिया (Ram Shankar Katheria) यांना शनिवारी MP/MLA न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार दंडाची शिक्षा सुनावली. कठेरिया यांना आग्रा येथील न्यायालयात एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. येथील एमपी-एमएलए न्यायालयाने राम शंकर कठेरिया यांना कलम 147 आणि 323 अंतर्गत दोषी ठरवले आहे.
साकेत मॉलमधील टोरेंट कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करून गोंधळ घातल्याचा आरोप भाजप खासदारावर करण्यात आला होता. ही घटना 16 नोव्हेंबर 2011 रोजी घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने राम शंकर कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच 50 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अशा स्थितीत राम शंकर कठेरिया (Ram Shankar Katheria) यांची खासदारकी जाऊ शकते, म्हणजेच संसदेचे सदस्यत्व संपुष्टात येऊ शकते.
दरम्यान, टोरेंट पॉवर लिमिटेड आग्राच्या साकेत मॉल कार्यालयात व्यवस्थापक भावेश रसिक लाल शाह वीज चोरीशी संबंधित प्रकरणांची सुनावणी आणि निकाल देत होते. यादरम्यान, स्थानिक खासदार राम शंकर कठेरिया यांच्यासोबत आलेल्या 10 ते 15 समर्थकांनी भावेश रसिक लाल शाह यांच्या कार्यालयात घुसून हाणामारी केली.
या घटनेत भावेश रसिक शाह यांना दुखापत झाली होती. यानंतर टोरंट पॉवरचे सुरक्षा निरीक्षक समेधी लाल यांनी हरिपर्वत पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, खासदार राम शंकर कठेरिया आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी हरिपर्वत पोलीस ठाण्याने खासदार राम शंकर कठेरिया यांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र पाठवले होते. या खटल्यातील साक्ष आणि वादविवादाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शनिवारी निकाल सुनावण्यात आला.
राम शंकर कठेरिया काय म्हणाले? | Ram Shankar Katheria
याप्रकरणी भाजप खासदार राम शंकर कठेरिया यांनी म्हटले आहे की, मी माननीय न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो आणि स्वीकारतो. माझा अधिकार वापरून मी यापुढे अपील करेन. दरम्यान, राम शंकर कथेरिया हे आग्रा येथून खासदारही राहिले आहेत. ते राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षही राहिले आहेत.