मुंबई,दि.५: भाजपा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. शिवसेनेत २१ जून २०२२ या दिवशी सर्वात मोठी फूट पडली. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्त्वात आलं. या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवार आणि त्यांच्यासह महत्त्वाचे आमदार यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला. आता काँग्रेस पक्षही फुटणार अशा चर्चा आहेत. अशात भाजपाचे दिग्गज नेते आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत
भाजपात येण्यासाठी रांगा लागल्या आहेत. काँग्रेसचे नेतेही आमच्या संपर्कात आहेत.मात्र आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नो रुम ॲव्हेलेबल, हाऊसफुल्ल असा बोर्ड लावला आहे असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांशी आमचं बोलणं झालं आहे. काँग्रेसचे नेते अधूनमधून भेटत असतात. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगाव की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोडणार नाही. असं थेट आव्हानच सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे.
राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अद्याप रखडलेला आहे. त्याविषयी विचारलं असता सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले हा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. फिजिक्सच्या विषयाला केमिस्ट्रीचा पेपर कसा येईल? असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंच्या काळात ठाकरेंनी फक्त घोषणा केली. मात्र महायुतीच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. हे खरं आहे काही काही शेतकऱ्यांना अजून मदत मिळणं बाकी आहे. पण आमचं सरकार ही मदत लवकरच देईल असंही मुनंगटीवार यांनी म्हटलं आहे.