बीड,दि.16: वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवाराला वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली आहे. तसेच तोंडाला काळेही फासले आहे. केज मतदारसंघात वंचितचे उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला होता. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते चव्हाण यांचा प्रचारही करत होते. भाजप पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या आरोपातून हा राजकीय राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार सचिन चव्हाण हे प्रचार करत असताना त्यांच्या तोंडाला काळे फसत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन चव्हाण यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी केला असून यामुळेच शैलेश कांबळे यांच्यासह वंचितच्य स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सचिन पवार यांच्या तोंडाला काळे फासले तसेच चाबकाने मारहाणही केली. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचेही शैलेश कांबळे यांनी सांगितले आहे. या घटनेची सध्या जिल्ह्यात चर्चा होत असून याबाबत अद्याप पोलिसांत नोंद झालेली नाही.
भाजपाला पाठिंबा का दिला अशी विचारणा करत जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी चव्हाण यांना काळे फासले व नंतर चाबकाचे फटके लगावले. यानंतर चव्हाण यांचा व्हिडीओ काढत त्यांना माफी देखील मागायला लावली आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नसला तरी या घटनेची चर्चा अख्ख्या बीडमध्ये सुरु आहे.