मुंबई,दि.२०: अम्पायर रिचर्ड केटलबॉरो यांच्या ‘त्या’ कृतीवरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. गुरुवारी वर्ल्डकपमध्ये झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये पंच रिचर्ड केटलबॉरो यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये न दिलेला वाईड बॉल सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. विराट कोहली वैयक्तिक ९७ धावांवर असताना हा प्रकार घडला. पंच रिचर्ड यांनी केलेली कृती योग्य होती की अयोग्य होती? यावर जशी सोशल मीडियावर चर्चा चालू आहे, तशीच त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळणारे मीम्सही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. काहींनी तर त्यांची तुलना थेट सचिन तेंडुलकरच्या काळात पंच म्हणून काम करणाऱ्या आणि सचिनच्या बाबतीत वादात राहिलेल्या पंच स्टीव्ह बकनर यांच्याशी केली आहे.
सामन्यात नेमकं काय घडलं?
बांगलादेशनं विजयासाठी ठेवलेलं २५७ धावांचं आव्हान भारतानं तीन गड्यांच्या मोबदल्यात ४२व्या षटकातच लीलया पार केलं. पण त्यात सर्वाधिक उत्सुकतेचा विषय ठरलं ते म्हणजे विराट कोहलीचं ४८वं एकदिवसीय शतक! विराट वैयक्तिक ७३ धावांवर असताना भारताला विजयासाठी २८ धावांची आवश्यकता होती. तेव्हापासूनच समोर उभ्या असलेल्या के. एल. राहुलनं विराटला जास्तीत जास्त खेळण्याची संधी कशी मिळेल याची काळजी घेतली.
४२व्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी अवघ्या दोन धावा हव्या असताना विराट वैयक्तिक ९७ धावांवर होता. त्यामुळे त्याला मोठा फटका खेळून किमान चौकार वसूल करणं आवश्यक होतं. तरच त्याचं शतक पूर्ण होऊ शकलं असतं. पण बांगलादेशचा फिरकीपटू नसूम अहमदनं पहिलाच बॉल वाईड टाकला. हा बॉल वाईड होता की नाही, यावर सध्या नेटिझन्समध्ये वाद चालू असला, तरी प्रथमदर्शनी तो वाईडच वाटत असताना पंच रिचर्ड केटलबॉरो यांनी मात्र तो वाईड दिला नाही!
वाईड बॉल आणि विराटचा लुक!
नसूमचा बॉल विराटच्या मागून विकेटकीपरच्या हातात स्थिरावताच विराटला काय घडलं हे क्लिक झालं आणि त्यानं प्रचंड भ्रमनिरासातून समोर पाहिलं. पंच रिचर्ड तो वाईड बॉल देतील अशी धास्ती विराटसह अवघ्या भारताला वाटू लागली होती. पण रिचर्ड यांनी तो वाईड बॉल न देऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पहिलाच बॉल वाईड झाला असता, तर भारताला विजयासाठी फक्त एका धावेची गरज राहिली असती. विराटच्या शतकासाठीच रिचर्ड यांनी तो वाईड बॉल दिला नाही, अशी चर्चा नेटिझन्समध्ये रंगू लागली आहे. त्यापुढच्याच बॉलवर विराटनं उत्तुंग षटकार खेचक आपलं शतक आणि भारताचा विजय साजरा केला!
स्टीव्ह बकनर यांच्याशी तुलना!
दरम्यान, या मुद्द्यावरून एक्सवर (ट्विटर) अनेक मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत. काहींनी रिचर्ड यांची तुलना स्टीव्ह बकनर यांच्याशी केली आहे. जर स्टीव्ह बकनर यांच्याजागी सचिन तेंडुलकरच्या काळात रिचर्ड केटलबॉरो अम्पायर असते, तर कदाचित सचिनच्या नावापुढे १२० शतकं राहिली असती, अशी पोस्ट एका युजरनं केली आहे!
काहींनी रिचर्ड केटलबॉरो यांच्याकडे विराटनं वाईड बॉल न दिल्यानंतर पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील सूचक हावभाव टिपत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काहींनी अम्पायरनं वाईड बॉल कसा दिला नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
काही युजर्सनं वाईड बॉल टाकणं हा बांगलादेशचा रडीचा डाव असल्याचं म्हणत रिचर्ड यांनी योग्यच केल्याचं म्हटलं आहे.
काहींचं म्हणणं आहे की रिचर्ड केटलबॉरो त्या विशिष्ट हावभावातून हे सांगण्याचा प्रयत्न करत असावेत की विराट कोहलीच्या शतकाचं थोडं क्रेडिट के. एल. राहुलप्रमाणेच मलाही मिळायला हवं!
दरम्यान, आयसीसीच्या नियमांनुसार जर अम्पायरला वाटलं की एखाद्या बॉलरनं जाणूनबुजून वाईड बॉल टाकला आहे, तर तो न देण्याचा निर्णय अम्पायर घेऊ शकतात, असाही दावा काही युजर्सनं चॅट जीपीटीवर आलेल्या उत्तराचा दाखला देत केला आहे.