सोलापूर,दि.29: शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सोलापुरात काँग्रेसचे लोकसभा उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेना होती म्हणून मोदी पंतप्रधान होऊ शकले. कळकट हात मोदींना बळकटीसाठी पाहीजे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
वापरायचं आणि फेकून द्यायच ही भाजपची नीती आहे. भाजपाने जयसिध्देश्वर स्वामींच्या मतांचाही वापर केला. आता जयसिध्देश्वर स्वामींनी श्राप द्यावा, असे उध्दव ठाकरे म्हणाले. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना बदलण्यासाठी भाजपाला 400 पेक्षा जास्त खासदार पाहिजेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते आणि दलीत होते भारतीय राज्यघटना त्यांनीच लिहिली म्हणून घटना बदलण्याचे षडयंत्र सुरू आहे. घटना बदलायचा प्रयत्न केल्यास संपूर्ण देश पेटून उठेल. 4 जूनपर्यंत थांबा. ईडी, सीबीआय आपल्या हातात असेल. तसेच मशाल हातात घेऊन तुतारी फुंकणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपाने दिलेल्या उमेदवाराला निर्यात करा आणि प्रणिती शिंदे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन ठाकरे यांनी केले. सुरूवातीच्या काळात भाजपाचे दोनच खासदार होते. आज भाजपाचे 300 खासदार आहेत. याचा उल्लेख करत जर जनता 2 खासदाराचे 300 खासदार करू शकते तर 300 खासदाराचे 2 खासदार करू शकते असे म्हणत आता एनडीएचे ते 2 खासदार निवडून आलेत पाहिजेत. बाकी सभागृहात आपले सगळे इंडिया आघाडीचे खासदार असतील, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.
2019 च्या निवडणुकीत 48 पैकी 42 खासदार निवडून देणे म्हणजे गंमत आहे का? तेव्हा शिवसेना सोबत होती म्हणून तुम्ही त्या तख्तावर बसलात. आता शिवसेना तुमच्यासोबत नाही, तुम्ही त्या तख्तापर्यंत पोहोचू शकत नाही आणि पोहोचू देणार नाही, असे ठाकरे म्हणाले.