“जे लोक आपला पक्ष सोडून गेले आहेत त्यांना आता…” उद्धव ठाकरे

0

मुंबई,दि.२९: शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी सायन विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. आज त्यांनी मातोश्री येथे सायन मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनाही इशारा दिला आहे.

जे लोक आपला पक्ष सोडून गेले आहेत त्यांना आता…

जे लोक आपला पक्ष सोडून गेले आहेत, त्यांना आता ‘जय महाराष्ट्र’. आता त्यांचे आणि आपले संबंध तुटले आहेत. आता एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी आता पक्षाशी गद्दारी करू नये. पक्षाविरोधी काम करू नये. अन्यथा आपल्याला शिवसैनिक म्हणून याकडे बघावं लागेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे.

सायन विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी तुम्हाला मागेच सांगितलं आहे की, ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या. माझ्या एक गोष्ट लक्षात येतेय की, कुणीतरी पक्षाला सोडून गेल्यानंतर आपल्या सागराला जास्त उधाण येतंय, मग ते उधाण रागाचं आहे… त्वेषाचं आहेय… जिद्दीचं आहे… आपली जिंकण्याची ईर्ष्याही आणखी वाढत आहे. पक्षातून जे गेलेत त्यांना आता ‘जय महाराष्ट्र’ आहे. आता त्यांचे आणि आपले संबंध तुटले आहेत.

शिंदे गटाला इशारा देत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मला आता एवढीच अपेक्षा आहे, त्यांनी (शिंदे गट) तिकडे गेल्यानंतर पक्षाशी गद्दारी करू नये. पक्षाविरोधी कामं करू नयेत. नाहीतर आपल्याला शिवसैनिक म्हणून याकडे बघावं लागेल. कोणत्याही परिस्थितीत आपले बालेकिल्ले राखायला तुम्ही सगळे समर्थ आहात. आता आपल्यात जे भक्तीचं उधाण येतंय, ते पाहून आता त्यांनाच धक्के बसतील. एवढं होऊनही शिवसेना का संपत नाहीये? उद्धव ठाकरे का संपत नाही? असा त्यांना प्रश्न पडेल. प्रत्येक वेळी टीका करताना त्यांना उद्धव ठाकरेंवरच बोलावं लागतं. कारण त्यांना तुमची धास्ती आहे. त्यामुळे एक-एक सहकारी फोडण्यापेक्षा एकदाच निवडणुका घेऊन दाखवा.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here