Turkey-Syria Earthquake: तुर्की, सीरिया भूकंपामुळे ४ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू

0

नवी दिल्ली,दि.७: Turkey-Syria Earthquake: तुर्की आणि सीरियामध्ये गेल्या २४ तासांत तीन मोठे भूकंपाचे धक्के बसले. एकापाठोपाठ एक झालेल्या भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून यात ४ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ हजारापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. अद्यापही बचावकार्य सुरू असून भारतातूनही NDRF च्या दोन टीम तुर्कीला रवाना झाल्या आहेत.

मोठ्या भूकंपानं सारंकाही उद्ध्वस्त | Turkey-Syria Earthquake

तुर्कीत १०० वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या भूकंपानं सारंकाही उद्ध्वस्त झालं आहे. ज्यानं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. काल पहाटे जेव्हा संपूर्ण देश साखरझोपेत होता. तेव्हा तुर्की आणि सीरिया हादरली. उंचच उंच इमारती पत्त्यासारख्या एका क्षणात कोसळल्या. वर्दळीच्या शहरांचं रुपांतर आज खंडरमध्ये झालंय. दोन्ही देशांमधील मृत्यूंचा आकडा आता वाढतच चालला आहे. आतापर्यंत ४ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यात तुर्कीतील २८०० तर सीरियामध्ये १२०० हून अधिक जणांचा समावेश आहे. 

Turkey-Syria Earthquake
तुर्की, सीरिया भूकंप

तुर्की आणि सीरियातील या कठीण प्रसंगी अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतानं मदतीचा हात पुढे करत मोठ्या प्रमाणात मदत पाठवली आहे. मदत आणि बचावासाठी गाझियाबादच्या हिंडन विमानतळावरुन एनडीआरएफच्या टीम तुर्कीसाठी रवाना झाल्या आहेत. 

पहिला भूकंप

सोमवारी पहाटे चार वाजता तुर्कीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं प्रमुख केंद्र गाझियान्टेप या शहरापासून ३३ किलोमीटर अंतरावर, तर नूर्दगी शहरापासून २६ किमी अंतरावर होते. तसेच हा भूकंप जमिनीपासून जवळपास १४.१ किलोमीटर खोलीवर झाला होता.

दुसरा भूकंप

सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्का जाणवल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात दुसरा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.

तिसरा भूंकप

दरम्यान, दोन भूकंपाचे धक्का बसल्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा एकदा टर्कीत भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ६.० रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.

तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी भूकंपामुळे झालेल्या विनाशाचे वर्णन शतकातील सर्वात मोठी आपत्ती असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दरम्यान ध्वज अर्ध्यावर आला आहे. आपत्तीच्या या कठीण काळात तुर्कस्तानला आपल्या जुन्या शत्रू देशांचाही पाठिंबा मिळत आहे. वर्षानुवर्षे सीमा विवाद असूनही ग्रीसने तुर्कस्तानला मदतीचे आश्वासन दिले आहे. याशिवाय नाटो, इस्लामिक सहकार्य संघटनेनेही तुर्कस्तानप्रती सहानुभूती व्यक्त करताना मदत देऊ केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here