मुंबई,दि.१३: व्यापार क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी, सातत्याने होणारी युद्धे या जागतिक घडामोडींमुळे सोन्याच्या भावात चढ-उतार होणार आहे. नव्या वर्षात सोन्याची किंमत प्रतितोळा ७० हजार रुपये होईल. सोन्यामधील गुंतवणूक सुरक्षित मानली जात असली तरी सोने ७० हजार रुपये होणार म्हणून घर-दार विकून सोने घेऊ नका, असा लाखमोलाचा सल्ला ज्वेलरी इंडस्ट्रीने दिला आहे. सोन्याकडे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहावे, असेही इंडस्ट्रीकडून सांगण्यात आले.
कोरोनानंतर तर सोन्याची मागणी वाढत आहे. राष्ट्रीय बँका, वित्तीय संस्था, म्युच्युअल फंडकडून सोन्याच्या मागणीत वाढ होते आहे. कारण सोन्यामधली गुंतवणूक ही सुरक्षित मानली जात आहे. कोरोनानंतर रशियाने ६०० टन सोने विकत घेतले होते. चीननेही सोने विकत घेतले होते. सेंट्रल बँक सोने घेत आहे. सोन्याची मागणी वाढत असली तरी वर्षानुवर्षे सोन्याचा पुरवठा मात्र मर्यादित आहे.
भारतात सुमारे ७ ते ८ लाख सोन्याची दुकाने आहेत.
राज्यात सुमारे अडीच लाख सोन्याची दुकाने आहेत.
मुंबईत सुमारे १ लाख सोन्याची दुकाने आहेत.
कोणत्या कॅरेटमध्ये काय बनते
१८ कॅरेटमध्ये डायमंडचे दागिने बनतात.
२२ कॅरेटमध्ये सोन्याचे दागिने बनतात.
२४ कॅरेटमध्ये नाणी, बार येते.
सोन्याचा भाव कॅरेटनुसार बदलतो.
सोन्याच्या किंमती कशा ठरतात?
सोन्याच्या किंमती युके आणि युएस मार्केटमध्ये ठरतात. मार्केटची किंमत, रुपये आणि डॉलरची किंमत, आयात शुल्क, शिपिंग असे घटक पकडून सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होते.
सोन्यात सट्टा करू नका. सोने ७० हजार होणार म्हणून घर, दार विकून सोने विकत घेऊ नका. सोने ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. सोने हे आपल्या बचतीमधून विकत घेण्याची गोष्ट आहे. एकूण गुंतवणुकीपैकी २० ते २५ टक्के गुंतवणूक सोन्यात असावी. सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक केली तर सोने नक्कीच चांगला परतावा देईल.