सोलापूर,दि.३०: खुनी हल्ल्याप्रकरणी सहा आरोपींचा जामीनचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यात हकीकत अशी की, फिर्यादी मारुती विश्वंभर गवळी यास हाताने, काठीने मारहाण करुन, शिवीगाळी करुन, त्याच्या डोक्यावर रिव्हॉल्वर रोखून, सोन्याची चैन व रोख रुपये २५०००/- जबदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती.
सदर फिर्यादीने दिनांक २५/१०/२०२२ रोजी आरोपी यशवंत विश्वंभर गवळी, गौरव यशवंत गवळी, गिरीष यशवंत गवळी, तुकाराम उर्फ आबा अंकुश गवळी, गणेश धर्मा चवरे व राजू आवारे यांच्या विरुद्ध मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी गिरीष गवळी, राजु आवारे, गणेश धर्मा चवरे, तुकाराम गवळी, यांना पोलीसांनी अटक केली होती.
त्याकामी सदर आरोपी गिरीष गवळी, राजु आवारे, गणेश धर्मा चवरे, तुकाराम गवळी, यांनी जामीन मिळणेसाठी व यशवंत गवळी व गौरव गवळी यांनी अटकपूर्व जामीन मिळणेसाठी अर्ज सोलापूर येथील सत्र न्यायालयात (न्यायाधीश के. डी. शिरभाते) दाखल केला होता.
सदरकामी मुळ फिर्यादी मारुती विश्वंभर गवळी, यांनी सदर जामीन अर्जामध्ये ॲड. अभिजीत इटकर व ॲड. राम शिंदे यांचे मार्फत हरकत घेवून सविस्तर लेखी युक्तिवाद दाखल केला. व सदर अर्जाचे सुनावणी वेळी सरकारी वकिल ॲड. दत्तूसिंग पवार यांनी असा युक्तिवाद केला की, सदर गुन्हयात वापरलेली हत्यारे ही घातक असून ती अद्याप जप्त करावयाची आहेत. तसेच यातील फिर्यादी मारुती गवळी व आरोपी नामे यशवंत गवळी हे सख्खे भाऊ असून त्यांच्यामध्ये जमिनीचा वाद चालु असून, तो सध्या मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. तसेच सदर शेतजमीन प्रकरणामध्ये सरकारकडून मिळालेला १२ कोटीच्या मोबदल्यासाठी सदरचा हल्ला केल्याची शक्यता नाकारता येत नाही व सदर आरोपींना जामीन मिळाल्यास परत असाच जीव घेणा हल्ला होण्याची दाट शक्यता आहे व अशा हल्ल्यात हकनाक जीव जावू शकतो असा युक्तिवाद ॲड. अभिजीत इटकर यांनी केला.
सदर मुळ फिर्यादीतर्फे दाखल केलेला लेखी युक्तिवाद तसेच सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयानी वरील सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले.
यात मुळ फिर्यादी तर्फे ॲड. अभिजित इटकर, ॲड. राम शिंदे यांनी, सरकार पक्षातर्फे ॲड. दत्तूसिंग पवार, तर आरोपी तर्फे ॲड. संग्राम देसाई (सिंधुदूर्ग) यांनी काम पाहिले.