सोलापूर,दि.18: केंद्र सरकारच्या स्वामित्व योजने अंतर्गत (Svamitva Scheme) आज दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण देशातील 246 जिल्ह्यातील 58 लाख लाभार्थी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते आभासी पध्दतीने सनद वाटप कार्यक्रम झाला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील 39 गावांमधील 4 हजार 859 स्वामित्व सनद वाटप जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सचिन कल्याणशेट्टी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्वामित्व सनद वाटप कार्यक्रम नियोजन भवन येथील सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार सचिन कल्याणशेट्टी होते तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा भूमिलेख अधीक्षक दादासाहेब घोडके, नगर भूमापन अधिकारी गजानन पोळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वामित्व योजना | Svamitva Scheme
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वामित्व योजने बाबतचे व ग्रामीण विकासाबाबतचे महत्व सर्वांना पटवून सांगितले. या अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचा एक प्रयत्न आहे. त्यानुसार केद्र शासन, भूमि अभिलेख विभाग व ग्रामविकास यंत्रणामार्फत लोकांना स्वांतत्र्यपूर्व काळापासुन अद्यापपर्यंत न झालेले त्यांचे घरांचे अभिलेख तयार करुन त्यांचा मालकी हक्काचा पुरावा म्हणून प्रत्येक गावठाणामधील घरांचा नकाशा व सनद अत्याधूनिक ड्रोन सर्व्हे द्वारे तयार केले आहेत. या तयार झालेल्या अभिलेखामुळे गावामधील लोकांना देखील गृहकर्ज मिळणेस मदत होणार आहे. त्या मिळणाऱ्या कर्जामुळे लघु उद्योगधंदे यांना चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख घोडके यांनी स्वामित्व योजनेचे व सनदेचे महत्व विषद केले व त्यासंदर्भातील चित्रफित सादर केली. यावेळी जिल्ह्यातील 39 गावांमधील 4859 नागरिकांना स्वामित्व हक्काची सनद मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आमदार सचिन कल्याण शेट्टी व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सनद वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक घोडके यांनी केले तर आभार गजानन पोळ यांनी मानले.
स्वामित्व योजनेमुळे जनतेच्या उत्पन्नात वाढ: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत असून यामुळे त्यांच्या आशा-आकांशा पुर्ण करत आहे. स्वामित्व योजनेंतर्गत जनतेला देण्यात आलेल्या कायदेशीर सनदेमुळे त्यांना मदत होत असून या सनदेच्या आधारे बँकेतून कर्जाद्वारे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.
केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे स्वामित्व योजनेंतर्गत सनद वितरणाचा शुभारंभ करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथीगृह येथून ऑनलाईन उपस्थित होते. मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, भूमी अभिलेख जमाबंदी आयुक्त व संचालक डॉ.सुहास दिवसे, विभागीय आयुक्त राजेश देशमुख तसेच पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील लाभार्थी उपस्थित होते.
प्रत्येक नागरिकांजवळ मालमत्तेचे अधिकार
देशातील गरीबी कमी करायची असेल तर प्रत्येक नागरिकांजवळ मालमत्तेचे अधिकार असणे गरजेचे आहे असे सांगून प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, देशातील लाखभर लोकांकडे संपत्ती असूनही त्यास किंमत मिळत नव्हती. स्वत:चे घर असूनही काही लोक त्यावर कब्जा करत होते. 2014 पासून आम्ही देशातील नागरिकांचे ड्रोन द्वारे सर्व्हेक्षण करून त्यांना प्रापर्टी कार्ड वितरित करत आहोत. यामुळे लोकांचे जीवन बदलणार असल्याचे प्रधानमंत्री यांनी सांगितले. स्वामित्तव योजनेंतर्गत या प्रॉपर्टी कार्डमुळे देशातील भ्रष्टचार कमी होणार आहे. आज 98 टक्के भूमी अभिलेखाचे संगणकीकरण करण्यात आले आहे. आज गावोगावी शौचालये, उज्ज्वला गॅस, जलपुरवठा, आयुष्यमान, सडके, इंटरनेट, ब्रॉडबँड सोबत कॉमन सर्व्हीस सेंटर या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. शहरामध्ये मिळणाऱ्या सुविधा आता गावात मिळत आहे. देशातील गरीब सशक्त झाला तरच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.