सोलापूर,दि.18: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जानकर हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून जानकर विजयी झाले आहेत. भाजपचे राम सातपुते आणि उत्तम जानकर यांच्यात चुरसीची लढत पाहायला मिळाली होती. यात जानकर विजयी झाले.
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकवाडी येथील नागरिकांनी निकालानंतर ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला होता. मारकवाडी गावातील नागरिकांचे म्हणणे होते की आमच्या गावातून भाजपाच्या उमेदवार राम सातपुते यांना लिड मिळणे शक्यच नाही.
यापूर्वीच आमदार उत्तम जानकर यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. निवडणूक आयोग जर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास तयार झाले तर मी लगेच राजीनामा देणार आहे, असे जानकर म्हणाले होते. बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यानंतर सत्य काय आहे? हे सर्व जनतेसमोर येईल, असे जानकर म्हणाले होते.
उत्तम जानकर राजीनामा देणार | Uttam Jankar
आमदार उत्तम जानकर यांनी 23 जानेवारीला राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटून राजीनामा देणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. तसेच प्रहारचे बच्चू कडू आणि मी 25 तारखेपासून जंतर मंतरवर उपोषण करणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.