पंढरपूर,दि.28: मोहिते पाटील व आम्ही एकत्र आल्यानंतर भाजपच्या नेत्यांची सोलापूर व माढा मतदारसंघांमध्ये पळापळ सुरू झाली असल्याचा टोला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. यावेळी त्यांनी या दोन्हीही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.
रविवारी, शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांनी आयोजित केलेल्या वार्तालापात ते बोलत होते. ते म्हणाले, मागील दहा वर्षांमध्ये ठोस कोणतीही काम झालेले नाही. स्मार्ट सिटी सारख्या चांगल्या योजना आणल्या गेल्या मात्र यातून मिळालेल्या निधी हा नको त्या कामांवर खर्च केल्याने सोलापूर शहराची अवस्था काय झाली आहे हे आपण पाहतोच. या निवडणुकीमध्ये आम्ही तरुणांना संधी दिली असून मतदार नक्कीच त्यांना लोकसभेत पाठवतील.
प्रणिती शिंदे या तीनवेळा आमदार झाल्या आहेत. मी त्यांना मंत्री करू शकत होतो. याबाबतची विचारणा मला झाली होती. मी देश पातळीवर काम करत असल्यामुळे मी माझ्या मुलीला कधीही मंत्री करू शकलो असतो. मात्र त्यांनी विधिमंडळ कामाचा जास्तीत जास्त अनुभव घ्यावा, अशी माझी इच्छा होती, असे शिंदे म्हणाले.
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करून अध्यक्ष अभिजीत पाटील यांना भाजपमध्ये येण्याचा तगादा लावला जात आहे यावर बोलताना शिंदे म्हणाले, जनतेला हे सगळं माहित आहे. आमच्या काळातही सरकारी यंत्रणा होत्या मात्र त्यांचा कधीही गैरवापर आम्ही केला नाही सध्या तर निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाही अनेक यंत्रणांचा वापर अशा चुकीच्या पद्धतीने केला जात आहे हे योग्य नाही. हे लोकशाही करता मारक आहे असे ते म्हणाले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी 400 पारचा जो नारा दिला आहे यावर बोलताना शिंदे म्हणाले, अशी स्थिती देशांमध्ये कुठेही दिसत नाही. 2004 मध्ये स्व. प्रमोद महाजन त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी शायनिंग इंडियाचा नारा दिला होता. मात्र त्यावेळी भाजप सत्तेपासून दूर गेले होते. मतदारांनी त्यांना नाकारलं होतं हे आपण सारे जाणतो. महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार विजय होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.