सोलापूर,दि.27: महापालिकेचे माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत कुरबुरी, कुरघोड्या, हेवेदावे, सतत अपमानित करण्याचा प्रयत्न, पक्षाच्या कार्यक्रमात सामावून न घेणे, होमटाऊनमध्ये येऊन राजकीय अतिक्रमण करणे अशा प्रकाराला कंटाळून सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी भाजपच्या प्रक्षश्रेष्ठींना आपली तक्रार मांडत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून हालचाली गतिमान झाल्या. वरिष्ठांनी पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई येथे बोलावून बंद दाराआड चर्चा करून राजीनामा मागे घेण्याची मनधरणी केली.
सुरेश पाटील यांनी घेतला मोठा निर्णय
यात त्यांना यश आले असून यामुळे सुरेश पाटील यांच्या बंडाच्या भूमिकेवर पडदा पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माजी सभागृह नेते सुरेश पाटील नाराज असल्याची चर्चा सुरू असताना बुधवारी मुंबईत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या समवेत सुरेश पाटील यांची बैठक झाली. यात अनेक गाऱ्हाणी पाटील यांनी मांडल्या. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याने सुरेश पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसमवेत काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन उघड नाराज व्यक्त केली होती व पाच नगरसेवकांनी दिलेल्या राजीनाम्यात सुरेश पाटील यांचादेखील राजीनामा असल्याने सुरेश पाटील पक्ष सोडणार अशी चर्चा जोरात सुरू होती. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश पाटलांना आपल्यावर अन्याय होणार नाही,अशी ग्वाही दिल्याने त्यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अक्कलकोट दौऱ्यावर आले असता,सुरेश पाटलांना दूरध्वनीवरून संपर्क साधून पक्ष न सोडण्याचा सल्ला दिला होता व मला भेटल्याशिवाय आपण कोणताही निर्णय घेऊ नका असे त्यांनी सांगितले होते. त्यांना त्यांनी मुंबईत भेटण्यासाठी वेळ दिली होती या बैठकीत त्यांनी आपण गेल्या 40 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीत काम करत आहात, आपणावर मी अन्याय होऊ देणार नाही,आपले कार्य मला माहित आहे आपणासारख्या कार्यकर्त्यामुळे आज पक्षाला चांगले दिवस आले असून, आपण निश्चिंत राहा मी आपल्या पाठीशी असून, पुढील महिन्यात मी सोलापूर दौऱ्यावर येणार असून, बोलल्याप्रमाणे आपल्या घरी चहापानासाठी येणार आहे.
यावेळी आपल्या अडचणी आणि तक्रारीवर पुन्हा एकदा चर्चा करून तोडगा काढू अशी हमी बावनकुळे यांनी सुरेश पाटलांना दिली आहे, असे सुरेश पाटील यांनी सांगितले.
वरिष्ठांच्या हमीमुळे समाधान
भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना आजपर्यंत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजन, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करता आले. संस्कार संपन्न पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. माझ्यावर होत असलेला अन्याय थांबवण्याची हमी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याने माझे समाधान झाले आहे. पक्षासाठी सतत झटणारे बावनकुळे हे पक्ष हिताचे धोरण चांगल्या पद्धतीने राबवत असल्याचा मला विश्वास आहे. यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. भविष्यात पक्ष माझा विचार करेल ही खात्री बावनकुळे साहेबांनी दिल्याने माझ्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.