सोलापूर,दि.11: केंद्र शासनाच्या भारतमाला परियोजने अंतर्गत सुरत-चेन्नई या राष्ट्रीय हरित महामार्गासाठी (Surat-Chennai Highway) सध्या भूसंपादन प्रक्रिया सुरु असून सोलापूर जिल्हयाअंतर्गत बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या तालुक्यामधून हा महामार्ग जात आहे. भूसंपादनाच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मौजे दडसिंगे तालुका बार्शी या गावात दिनांक 18 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या शिबिराचा लाभ सर्व संबंधितांनी घ्यावा असे आवाहन सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन (क्रमांक 11) अभिजीत पाटील यांनी केले आहे.
Surat-Chennai Highway
बार्शी तालुक्यातील 16 गावांमधून 9 गावांना नुकसान भरपाई नोटीस पारित केल्या आहेत. मौजे दडशिंगे ता.बार्शी या गावातील एकूण 36 गट धारकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. संपादनाचे नुकसान भरपाई मागणी प्रस्ताव प्राप्त करुन घेऊन त्यांची त्वरीत तपासणी करुन नुकसान भरपाईची रक्कम अदा करणेकामी पुढील प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी गाव पातळीवर नुकसान भरपाई रक्कमेचे प्रस्ताव दाखल करुन घेणे, दाखल प्रस्तावामधील त्रुटींची पूर्तता करुन देणे, संबधित आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन घेण्यासाठी दि. 18 जुलै 2023 रोजी मौजे दडशिंगे या गावी सकाळी 11 वाजता शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
मौजे दडशिंगे ता.बार्शी येथील संपादित जमिन धारकांना कळविण्यात येते की, संपादित जमिनीची नुकसान भरपाई मिळणेबाबतचे प्रस्ताव या शिबिरात दाखल करावेत. प्रस्ताव सादर करण्यासाठी विहित नमुने तलाठी कार्यालयात उपलब्ध आहेत. या शिबिरामध्ये नुकसान भरपाई मागणी प्रस्तावाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे पाटील यांनी कळविले आहे.