ग्रामसेवकांनी लाच म्हणून मागितले दोन दारूचे खंबे, ACB ने केली कारवाई

0

जालना,दि.11: लाच म्हणून पैसे मागितल्याच्या अनेक घटना घडतात. अशांवर ACB कडून वेळोवेळी कारवाईही केली जाते. मात्र लाच म्हणून दारूचे खंबे मागितल्याचे कधी ऐकले किंवा पाहिले नसेल. जालना (Jalna) जिल्ह्यात लाच (Bribe) मागणाऱ्या दोन ग्रामसेवकांविरूद्ध एसीबीच्या (ACB) पथकाने कारवाई केली आहे. बांधकामाचा निधी काढून देण्यासाठी लागणाऱ्या परवानगी बीडीओंची सही लागत होती. त्यामुळे बीडीओंची सही घेऊन देण्यासाठी सात हजार रूपये किंवा दारूचे दोन खंबे देण्याची मागणी या ग्रामसेवकांनी केली होती. मात्र तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठत तक्रार दिली आणि त्यानंतर एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. तर या प्रकरणी जालन्यातील बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण लाचेच्या बदल्यात दारूचे दोन खंबे देण्याची मागणी करण्यात आल्याने या कारवाईची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. सिद्धार्थ कृष्णा घोडके (वय 42 वर्षे, मांजरगाव ता. बदनापूर), पुष्पा महाजन अंबुलगे (वय 40 वर्षे, रा. उजैनपुरी ता. बदनापूर) असे कारवाई झालेल्या दोन्ही ग्रामसेवकांची नावं आहेत.

लाच म्हणून मागितले दोन दारूचे खंबे

ACB कडून मिळालेल्या माहितीनुसार, जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथील भूमीगत नाली बांधकामाला काही दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली होती. दरम्यान काम पूर्ण झाल्यामुळे एमबीवर व उर्वरित 1 लाख 48 हजार 467 रूपये मजुरांना व साहित्य देणाऱ्या दुकानदारांना रक्कम अदा करण्याच्या परवानगी पत्रावर गटविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी लागते. मात्र ही स्वाक्षरी मिळवून देण्यासाठी बदनापूर पंचायत समितीतील लांडगे व घोडके यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. पण लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार केली.

ब्लॅक डॉगचे दोन खंबे

तक्रार आल्याने एसबीच्या पथकाने 20 जून रोजी सापळा लावून लाचेच्या मागणीबाबत पडताळणी केली. यावेळी मांजरगावचे ग्रामसेवक सिध्दार्थ घोडके यांनी पंचासमक्ष,”तुमचे काम रिक्वेस्ट करून आणून दिले असून, त्यासाठी 11 हजार रूपये द्यावे लागतील असे म्हटले. तसेच ते शक्य नसल्यास सहा-सात हजार रूपये लगेच द्यावे लागतील, किंवा दोन हजारांना मिळणारे ब्लॅक डॉगचे दोन खंबे द्यावे लागतील, अशी मागणी केली. विशेष म्हणजे याचवेळी घोडके यांनी ग्रामसेविका अंबुलगे यांना बोलावून तुमचे किती परसेंटेज असते मॅडम सरपंचांना सांगा असे सांगितले. त्यामुळे लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीच्या पथकाने या प्रकरणी सिद्धार्थ कृष्णा घोडके आणि पुष्पा अंबुलगे या दोन्ही ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल केला.

ग्रामसेवक अंबुलगे यांनी बीडीओ यांना एक लाखाला चार हजार रुपये द्यावे लागतील असे म्हटले. तर विस्ताराधिकाऱ्यांना दीड ते दोन हजार, क्लार्क असलेल्या लांडगे यांना 500 रूपये द्यावे लागतील, असे देखील तक्रारदारास सांगत लाच देण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here