Shivsena Crisis: शिंदे गटाने न्यायालयाला दिला शब्द, पुढील दोन आठवडे…

0

नवी दिल्ली,दि.२२: Shivsena Crisis: शिंदे गटाने न्यायालयाला शब्द दिल्याने पुढील दोन आठवडे ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी सुरू आहे. आजही ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद होत आहे. सिब्बलांनी अनेक सवाल उपस्थित करत शिंदे गटाच्या वकिलांसमोर पेच निर्माण केला आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या वकिलाकडून एक मोठे आश्वासन कोर्टात देण्यात आले आहे.

शिंदे गटाल प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश | Shivsena Crisis

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ठाकरे गटाने दाखल केलेल्या याबाबतच्या याचिकेवर आज (२२ फेब्रुवारी) सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाल प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आगामी सुनावणीपर्यंत शिवेसना पक्षाकडून व्हीप जारी केला जाणार नाही, असे आश्वासन शिंदे गटाकडून देण्यात आले आहे. दोन आठवड्यानंत या याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी घेतली जाईल.

काय म्हणाले कपिल सिब्बल?

कोर्टात युक्तीवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की, भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली नियुक्ती चुकीची आहे, त्यामुळे त्यांना व्हीप बजावण्याचा अधिकार नाही. आम्हाला नव्या अध्यक्षांकडे जायचं नाही, नव्या अध्यक्षांची नियुक्ती चुकीची आहे, असा युक्तिवादही कपिल सिब्बलांनी केला. त्यावर आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करू शकत नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली.

शिंदे गटाचे आश्वासन

निवडणूक आयोगाने त्यांना राजकीय पक्ष  म्हणून मान्यता दिली आहे, व्हिप काढला तर आमच्याकडे कुठलंही संरक्षण राहणार नाही. त्यामुळे परिस्थिती जैसे थे ठेवण्याची विनंती ठाकरे गटाच्या वकिलांनी केली. याला शिंदे गटाकडून सकारात्कम प्रतिसाद देण्यात आला असून, व्हिप काढणार नसल्याचे आणि आमदारांना अपात्र ठरवणार नसल्याचे आश्वासन शिंदे गटाकडून देण्यात आले आहे. जेव्हा नीरज कौल म्हणाले की, आम्ही दोन आठवड्यांपर्यंत व्हिप काढणार नाही, तेव्हा न्यायमूर्ती म्हणाले आम्ही तुमचं हे बोलणं रेकॉर्डवर घेत आहोत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने काहीअंशी ठाकरे गटाला दिलासा दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here