मुंबई,दि.29: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी विधानसभेत जोरात सुरु आहे. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांची उलट तपासणी सुरू आहे. आजच्या उलट तपासणी दरम्यान सुनील प्रभू यांनी आपल्या साक्षीत बदल केला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्या आधी नोंदवलेल्या साक्षीत अध्यक्षांच्या परवानगीने साक्ष बदलण्यात आली.
एकनाथ शिंदे यांना सुनील प्रभू यांनी 22 जून 2022 मध्ये एक पत्र पाठविले होते, ते इंग्रजीत होते. यावरूनही वकील जेठमलानी यांनी प्रभूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच हे पत्र तुम्ही शिंदेंना कसे पोहोच केले असा सवालही त्यांनी केला. यावर आपण ते व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दिल्याचे प्रभूंनी म्हटले. याचा पुरावा सादर करू शकता का असे जेठमलानींनी विचारताच प्रभू अडकले.
यावेळी प्रभू यांनी प्रयत्न करतो असे सांगितले. तसेच माझ्या की कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून पाठविले ते तपासावे लागेल असेही प्रभू म्हणाले. यानंतर लंच ब्रेक झाला, तेव्हा प्रभू यांनी आपल्याला साक्ष बदलायची आहे असे विधानसभा अध्यक्षांना सांगत विनंती केली.
आपण एकनाथ शिंदेंना मेलवरून पत्र पाठविले होते. लंच ब्रेकमध्ये त्याची तपासणी केली तेव्हा ते लक्षात आले, यामुळे आपली साक्ष बदलायची आहे, असे प्रभू म्हणाले. याला नार्वेकरांनी संमती देत त्यांची साक्ष बदलण्यास परवानगी दिली. या मेलवरूनही जेठमलानी यांनी प्रभू यांना प्रश्न विचारले, तेव्हा हा मेल पक्ष कार्यालयातील जोशी या कर्मचाऱ्याने पाठविल्याचे प्रभू यांनी सांगितले.