राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत एक कोटी 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

सोलापूर,दि.8: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवेढा, सोलापूर येथे कारवाई करून अवैध विदेशी मद्याचे 1374 बॉक्ससह दोन वाहने असा एकूण एक कोटी 26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकास मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या परराज्यातील गोवा विदेशी मद्याची गोवा राज्यातून मंगळवेढा मार्गे सोलापूर येथे विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नुकतीच कारवाई करण्यात आली.

ही उल्लेखनीय कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप यांच्या आदेशानुसार, विभागीय उप आयुक्त सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त प्रसाद सुर्वे, संचालक उषा वर्मा, अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये भरारी पथकाचे प्रमुख संताजी लाड, मनोज चव्हाण, दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे, प्रमोद कांबळे यांच्यासह त्यांच्या जवान व वाहनचालक या सहकाऱ्यांचा सहभाग होता.

कारवाईमध्ये टाटा कंपनीच्या दोन मालवाहक ट्रकची दारूबंदी कायद्याअंतर्गत तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अवैध विदेशी मद्याचे 1374 बॉक्स ताब्यात घेण्यात आले. ट्रक चालक चंद्रकांत शेरे आणि महावीर भोसले यांच्याविरोधात दारूबंदी कायद्याअन्वये कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाटा कंपनीचे सहा चाकी दोन कंटेनर, गोवा बनावटी निर्मित विदेशी मद्याचे 1324 बॉक्स, टुबर्ग तीव्र बिअर 500 मिलीचे 50 बॉक्स मौजे शिरसी-मंगळवेढा रोड, शिरसी गावचे पूर्वेस पाणी टाकीजवळील रोड येथून मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाई सुरू आहे. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास व्हॉट्सअप 8422001133 तसेच दूरध्वनी क्र 022-22663881 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here