मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया रद्द

0

सोलापूर,दि.3: सोलापूर जिल्ह्यातील मारकवाडी गावातील लोकांनी आज 3 डिसेंबरला बॅलेटपेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा निकाल जरी उत्तम जानकर यांच्याबाजूने लागला असला तरी मारकवाडी गावातील लोकांनी ईव्हीएम मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. मारकवाडी गावातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाले होते. यावरच गावातील लोकांचा आक्षेप होता. 

मारकवाडी गावातील लोकांचे म्हणणे आहे की आमच्या गावातून राम सातपुते यांना मताधिक्य मिळणे शक्य नाही. गावातील लोकांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन दिले होते. तसेच गावातील लोकांचे पुन्हा मतपत्रिकेवर (बॅलेट पेपर) मतदान घेण्याची मागणी केली होती. गावातील लोकांनी मतपत्रिकाही छापून आणल्या आहेत. 

मात्र पोलिसांनी ही प्रक्रिया आज हाणून पाडली. पोलीस प्रशासनाच्या दबावामुळे आजचे मतदान रद्द केल्याचे जाहीर करीत अन्य मार्गाने न्याय मागू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर म्हणाले.

आज मारकवाडी गावात मतदान केंद्र, मत पत्रिका आदी निवडणुकीची जय्यत करण्यात आली होती. सकाळी 8 ते 5 यावेळेत ही मतदान प्रक्रिया पार पडणार होती. या मतदान प्रक्रियेला प्रशासनाने सहकार्य करण्याची विनंती ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे केली होती.

मात्र तहसिलदारांनी ग्रामस्थांची मागणी फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया न राबविण्याची सूचना केली होती. पोलीस यंत्रणेने तर गावातील प्रमुख लोकांना नोटीस देऊन मतदान प्रक्रिया थांबविण्याची सूचना केली होती. पोलीस यंत्रणा एवढ्यावरच थांबली नाही त्यांनी गावात 144 हे जमावबंदीचे कलम लागू केले.

लोक गावच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमू लागले तोच पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला. सशस्त्र पोलीस गावात दाखल झाल्याने, गावात भीतीचे वातावरण पसरले. पोलिसांनी स्पीकर वरुन गावकऱ्यांना जमावबंदी असल्याच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या या दमबाजीमुळे लोक घराकडे परतू लागले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here