सोलापूर,दि.२: मॉर्निंग वॉकला गेलेल्या पत्नीला रस्त्यात अडवून मारहाण करणे आणि तिचे सोन्याचे दागिने व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याच्या आरोपातून पती धनराज प्रकाश भोगडे याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विनायक रेडकर यांनी हा निकाल दिला. बचाव पक्षाच्या वकिलांनी घेतलेली उलटतपासणी या खटल्यात अत्यंत निर्णायक ठरली.
मानपानावरून वाद आणि छळ
फिर्यादी महिला आणि धनराज भोगडे यांचा विवाह २०१९ मध्ये झाला होता. लग्नात मानपान व्यवस्थित झाला नाही या कारणावरून पतीने लग्नानंतर काही दिवसांतच टोमणे मारत छळ सुरू केला व डिसेंबर २०२० मध्ये पत्नीला घरातून हाकलून दिले. जानेवारी २०२१ मध्ये पत्नीने सासरी परतण्याचा प्रयत्न केला असता, तिला पुन्हा मारहाण करण्यात आली. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.
रस्त्यात गाठून दागिने ओरबाडल्याचा आरोप
२७ जुलै २०२१ रोजी सकाळी ६:३० वाजता फिर्यादी महिला रूपा भवानी चौक परिसरात मॉर्निंग वॉक करत असताना, आरोपी धनराज मोटारसायकलवरून तिथे आला. त्याने पत्नीला अडवून शिवीगाळ सुरू केली. पत्नी जेव्हा पोलीस कंट्रोल रूमला फोन करू लागली, तेव्हा पतीने तिला चापट मारून हातातील मोबाईल आणि कानातील सोन्याची रिंग जबरदस्तीने ओरबाडून नेली, अशी तक्रार जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाचा निकाल
या खटल्याच्या सुनावणीत सरकारी पक्षाने ११ साक्षीदार तपासले. मात्र, बचाव पक्षाच्या वकिलांनी फिर्यादी आणि तपासाधिकारी यांच्या साक्षीत असणारे विसंगत मुद्दे उलटतपासणीत कोर्टासमोर आणले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्यांभावी आरोपी पतीची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपीच्या वतीने ॲड. अभिजित इटकर, ॲड. राहुल गायकवाड, ॲड. राम शिंदे, ॲड. संतोष आवळे, ॲड. फैयाज शेख आणि ॲड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.








