Home महाराष्ट्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘ती’ पोस्ट केली डिलीट, मुंबई पोलिस आयुक्तांनी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘ती’ पोस्ट केली डिलीट, मुंबई पोलिस आयुक्तांनी केली होती विनंती

0
Raj Thackeray

सोलापूर,दि.२५: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अलिकडेच सोशल मीडियावर शेअर केलेली प्रसिद्ध उद्योगपती सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री (Documentary) अखेर आपल्या X (ट्विटर) अकाऊंटवरून डिलीट केली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीचा मान राखून हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करतानाच, “जी आग लागायची ती लागली आहे,” असा रोखठोक इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

“अदानी-मोदी संबंधांवर भाष्य करणारी डॉक्युमेंट्री viral”

राज ठाकरे यांनी X वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध आणि त्यातून देशातील उद्योगविश्व एकाच हाती कसे केंद्रित केले जात आहे, यावर सबीर भाटिया यांनी डॉक्युमेंट्री बनवली होती. ती शेअर केल्यानंतर ट्विटरवर (X) ४८ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि फेसबुकवरही प्रचंड प्रतिसाद मिळाला. या विषयाचे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवणे हाच मूळ हेतू होता आणि तो पूर्ण झाला आहे.

“वरच्यांच्या पोटात गोळा आला”

या डॉक्युमेंट्रीला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटात भीती निर्माण झाल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. “या डॉक्युमेंट्रीमुळे वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि गुपित फुटण्याची भीती वाटणे स्वाभाविक होते. पण ती भीती इतकी तीव्र होती की, मला थेट मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही पोस्ट काढून टाकण्याची विनंती करण्यात आली,” असा खुलासा त्यांनी केला.

महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल असून त्यांच्याबद्दल नेहमीच आदर राहिला आहे, म्हणून पोलीस प्रमुखांच्या विनंतीचा मान राखत ही डॉक्युमेंट्री पोस्ट डिलीट करत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांचे गंभीर आरोप व मुख्य मुद्दे:

एकाधिकारशाहीला विरोध (Monopoly):

“माझा विरोध कोणत्याही व्यक्तीला नाही, तर एकाधिकारशाहीला आहे. पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपतींना मोठे करावे, रोजगार आणि प्रचंड संपत्ती निर्माण करण्यासाठी मदत करावी. पण ते सोडून एकाचेच लाड केले जाणार असतील आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल, तर अदानीच काय, कोणाच्याही एकाधिकारशाहीला आमचा विरोध राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र विकला जातोय, लोकप्रतिनिधी गप्प का?

भीमाशंकर परिसरातील काहीशे हेक्टर वनजमीन (Forest Land) गुजरातच्या टोरेंट कंपनीच्या घशात घालण्याचे षड्यंत्र केंद्र सरकार रचत असल्याचा आरोप त्यांनी केला. “आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जात असताना मराठी खासदार, आमदार आणि मंत्र्यांची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही? सत्तेसमोर इतकी लाचारी शोभणारी नाही. मग शिवछत्रपतींच्या घोषणा देणे आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा देखावा (Farce) कशासाठी करता?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

लढा सुरूच राहणार:

“जानेवारी २०२६ मध्ये शिवतीर्थावरील सभेत मी या एकाधिकारशाहीविरुद्ध टाकलेली ठिणगी आता वणवा बनली आहे. आमचा लढा असाच सुरू राहील,” असा निर्धार व्यक्त करत राज ठाकरे यांनी जानेवारी २०२६ मधील आपल्या प्रेझेंटेशनच्या (Presentation) व्हिडिओ क्लिप्स पुन्हा एकदा सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.