Home महाराष्ट्र ५०० कोटींची कथित ॲाडिओ क्लिप; मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा

५०० कोटींची कथित ॲाडिओ क्लिप; मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा

0
मनोज जरांगे पाटील-एकनाथ शिंदे

जालना,दि.२६: राज्यभरात सध्या प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि स्फोटक भूमिका घेतली आहे. ही ऑडिओ क्लिप ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आली आहे, असा दावा करून सत्ताधाऱ्यांना किंवा भाजपला या प्रकरणातून सहजासहजी पळवाट शोधता येणार नाही, असा कडक इशारा जरांगे यांनी दिला आहे. जालना येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, या संपूर्ण प्रकरणामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा मोठा कट होता का, असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे.

एकनाथ शिंदेंच्या करिअरला उद्ध्वस्त करण्याचा डाव?

पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ही व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप म्हणजे थेट एकनाथ शिंदे यांच्या राजकीय अस्तित्वावर आणि वैयक्तिक आयुष्यावर घातलेला घाव आहे. याद्वारे त्यांचे राजकीय भविष्य संपवण्याचा पूर्वनियोजित कट रचला गेला होता का, अशी दाट शंका निर्माण होत आहे. या गंभीर प्रकारानंतर एकनाथ शिंदे आता गप्प बसणार नाहीत, असे सांगत जरांगे यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी केली.

देवेंद्र फडणवीसांना अंधारात ठेवल्याचा संशय

या संपूर्ण षड्यंत्रामध्ये भाजपचे काही लोक सहभागी असले, तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्लॅनिंगबाबत कोणतीही कल्पना नसावी, असे मोठे विधान जरांगे यांनी केले. त्यांनी पुढे म्हटले की, “फडणवीस साहेबांनी जर या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास केला, तर त्यांच्या स्वतःच्या आणि एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कसा मोठा ‘गेम’ खेळला जात होता, हे त्यांच्या लक्षात येईल.” या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना मदत करण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दिल्ली दरबारातून सूत्रे हलत असल्याची शक्यता

क्लिपमध्ये संभाषण करणारे लोक नेमके कोणाच्या इशार्यावर काम करत आहेत? ही कोणती यंत्रणा आहे आणि यांच्या पाठीवर नेमका कोणाचा वरदहस्त आहे? असे अनेक प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केले. या बैठका आणि सुनियोजित नरेटिव्ह सेट करण्यामागे भाजपपेक्षाही मोठी ताकद किंवा दिल्लीतील एखाद्या बड्या नेत्याचा हात असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच, आपल्याविरोधात बोलणाऱ्या सर्वांना पैशांच्या नोटा वाटल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

‘एआय’च्या नावाखाली पळवाट चालणार नाही – जरांगे

“माझ्याकडे कोणतीही आधुनिक यंत्रणा नाही, मी एआय (AI) व्हिडिओ किंवा क्लिप कशी तयार करणार? तुम्ही प्रत्येक गोष्टीला एआय कसे काय म्हणू शकता?” असा सवाल करत जरांगे यांनी भाजपवर निशाणा साधला. मराठीमध्ये अशा स्वरूपाची एआय निर्मिती करणे प्रत्येकालाच शक्य नाही, असे सांगत या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी कोणत्याही राजकीय दबावाखाली न येणाऱ्या स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत किंवा ‘ईडी’मार्फत (ED) कसून चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रकरण आता राष्ट्रीय पातळीवर

दुसरीकडे, या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपचा वाद आता केवळ राज्य राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले असून, ५०० कोटींच्या या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आणखी मोठी खळबळ उडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.