Home क्राइम रस्त्याच्या वादातून सोन्याची चेन हिसकावल्याचा आरोप; मोहोळमधील द्राक्ष बागायतदाराला अटकपूर्व जामीन मंजूर

रस्त्याच्या वादातून सोन्याची चेन हिसकावल्याचा आरोप; मोहोळमधील द्राक्ष बागायतदाराला अटकपूर्व जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.१७: शेत रस्त्याच्या वादातून एका व्यक्तीला मारहाण करत त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा आरोप असलेल्या येवती (ता. मोहोळ) येथील द्राक्ष बागायतदार मधुकर विठ्ठल गोडसे यांना सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. गोडसे यांच्यातर्फे न्यायालयात मांडण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा दिलासा दिला.

नेमके काय आहे प्रकरण?

फिर्यादीच्या वडिलांच्या नावावर मौजे येवती (ता. मोहोळ) येथे २ एकर शेती असून, या जमिनीच्या गट नंबरची केस दिवाणी कोर्टात प्रलंबित आहे. फिर्यादीच्या कुटुंबाला शेतात जाण्यासाठी गेल्या अनेक पिढ्यांपासून १२ फुटांचा गाडी रस्ता आहे. हा रस्ता आरोपी मधुकर गोडसे यांच्या शेतातून जातो. याच रस्त्याच्या कारणावरून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात जुना वाद असून, आरोपी गोडसे हे वारंवार फिर्यादीची वाट अडवून शिवीगाळ व दमदाटी करत असल्याचा आरोप फिर्यादीने केला होता.

कुलूप काढण्यावरून वाद आणि मारहाण

तक्रारीनुसार, २ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपी मधुकर गोडसे हे रस्त्यात लोखंडी अँगल रोवत होते, त्याला फिर्यादीने विरोध केला होता. त्यानंतर ९ एप्रिल २०२६ रोजी गोडसे यांनी या शेत रस्त्याच्या गेटला कुलूप लावले. फिर्यादी आणि त्यांच्या चुलत भावाने हे कुलूप काढले असता, आरोपीचा मुलगा राहुल गोडसे तिथे आला आणि त्याने शिवीगाळ सुरू केली.

त्यानंतर राहुलने फोन करून वडील मधुकर गोडसे यांना बोलावून घेतले. मधुकर गोडसे यांनी दुचाकीवरून येत फिर्यादी आणि त्यांच्या भावाला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. याच वेळी मधुकर गोडसे यांनी फिर्यादीच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली, असा आरोप फिर्यादीने मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत केला होता. तसेच शेतातील पाण्याचा वॉल बंद करतानाही पुन्हा मारहाण करत ‘जिंवत सोडणार नाही’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले होते.

न्यायालयातील युक्तिवाद आणि निकाल

या प्रकरणी अटक टाळण्यासाठी आरोपी मधुकर विठ्ठल गोडसे यांनी वकील अॅड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

न्यायालयात आरोपीच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की:

“आरोपी आणि फिर्यादी यांच्यात केवळ शेताच्या रस्त्यावरून दिवाणी वाद सुरू आहे. आरोपीवर दबाव आणण्याच्या उद्देशाने आणि केवळ अडकवण्यासाठीच सोन्याची चेन हिसकावल्याचा खोटा आरोप करत ही फौजदारी केस दाखल करण्यात आली आहे.”

हा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूरचे माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपी मधुकर गोडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. अभिजीत इटकर, अॅड. राम शिंदे, अॅड. संतोष आवळे, अॅड. फैयाज शेख आणि अॅड. सुमित लवटे यांनी कामकाज पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.