Home देश दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा आदेश

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा आदेश

0

सोलापूर,दि.२८: सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करता, स्थानिक पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यात उत्पादित होणारा सर्व प्रकारचा चारा आणि मुरघास जिल्ह्याबाहेर किंवा इतर राज्यांत विक्रीसाठी वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. कार्तिकेयन यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १४४ अन्वये हे आदेश जारी केले आहेत.

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त अहवालानुसार, सध्या सोलापूर जिल्ह्यातील पशुधनासाठी डिसेंबर २०२६ पर्यंत (सुमारे १२० दिवस) पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. मात्र, हा चारा किंवा मुरघास इतर जिल्ह्यांत वा राज्यांत पाठवून विक्री केल्यास जिल्ह्यात तीव्र चाराटंचाई निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. ही शक्यता गृहीत धरूनच प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

जून २०२७ पर्यंत आदेश लागू

हा प्रतिबंधात्मक आदेश जारी झाल्याच्या दिनांकापासून जून २०२७ अखेरपर्यंत लागू राहील. या कालावधीत जिल्ह्यातील चारा किंवा मुरघास बाहेर नेण्यास पूर्णपणे मनाई असेल. आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, कृषी, पशुसंवर्धन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याचा तुटवडा भासू नये आणि संभाव्य टंचाई टाळता यावी, या मुख्य उद्देशाने जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.