मुंबई,दि.२८: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर अजय महाराज बारसकर (Ajay Baraskar) यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत गंभीर आणि सनसनाटी आरोप केले आहेत. “मनोज जरांगे हे मराठ्यांचे संघर्ष योद्धा नसून टेंडर योद्धा आहेत, तसेच ते सरकारचे पाळीव कुत्रे आहेत,” असा थेट आणि जळजळीत घणाघात बारसकर यांनी केला आहे.
मंत्रालयातील तक्रारीवर कारवाई; सत्यशोधनाला पहिले यश
पत्रकार परिषदेत बोलताना अजय महाराज बारसकर यांनी कागदपत्रे दाखवत सांगितले की, त्यांनी २० मे रोजी मंत्रालयात मनोज जरांगे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल शासनाने घेतली असून २१ सप्टेंबर रोजी शासकीय आदेश प्राप्त झाला आहे. आपल्या मागणीला आणि सत्यशोधनाला हे पहिले यश मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला.
“वाळूचोर बरोबर का?” टेंडर योद्ध्यावरून निशाणा
जरांगेंच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत बारसकर म्हणाले, “जरांगे, तुम्ही पत्रकार परिषदेत आम्ही सगळे चांगले मराठे आहोत असे म्हणता, मग तुम्ही या वाळूचोरांना सोबत का ठेवले आहे?”
पुढे बोलताना बारसकर म्हणाले, “जरांगे, तू मराठ्यांचा संघर्ष योद्धा नाहीस, तर टेंडर योद्धा आहेस. आंदोलनाच्या नावाखाली पैसे गोळा करायचे आणि जमिनी खरेदी करत सुटायचे, हाच यांचा धंदा सुरू आहे.”
जालन्यातील जमिनींच्या खरेदीवरून पैशांच्या स्रोतावर प्रश्न
जरांगे यांच्या नातेवाईकांनी जालन्यात घेतलेल्या जमिनींचा पाढा वाचताना बारसकर यांनी नावे घेऊन आरोप केले. स्वस्तिक भाऊसाहेब जरांगे आणि ओंकार भाऊसाहेब जरांगे यांनी जालन्यातील शिरस मार्ग व देवराई परिसरात जमिनी खरेदी केल्याचा दावा त्यांनी केला.
“एकीकडे सामान्य मराठा समाजावर स्वतःची जमीन-शेती विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ आली असताना, जरांगेंच्या या नातेवाईकांकडे जमिनी खरेदी करण्यासाठी एवढा पैसा आला कुठून?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘संविधानाने दिलेला अधिकार कोणी हिरावू शकत नाही’
प्रश्न विचारण्यावरून आणि पत्रकार परिषदांवरून जरांगे यांच्यावर टीका करताना बारसकर म्हणाले, “प्रश्न विचारू नका, बोलू नका, पत्रकार परिषदा घेऊ नका, असे सांगणारे तुम्ही कोण? भारतीय संविधानाने मला बोलण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आहे. तुम्ही आमचे तोंड बंद करू शकत नाही.”
“मनोज जरांगे हा सरकारचा पाळीव कुत्रा”
अजय महाराज बारसकर यांनी आपल्या वक्तव्याच्या शेवटी अत्यंत तीव्र शब्दांत सरकार आणि जरांगे यांच्या संबंधांवर भाष्य केले. “मनोज जरांगे यांच्यामध्ये एवढी शक्ती कुठून आली आणि ही शक्ती त्यांना कोणी दिली? ही सगळीच्या सगळी शक्ती मनोज जरांगेला सरकारनेच दिली आहे. मनोज जरांगे हा सरकारचा पाळीव कुत्रा आहे,” असा खळबळजनक आरोप करत बारसकर यांनी या सर्व आरोपांवर जरांगेंनी थेट उत्तरे द्यावीत, असे आव्हान दिले.







