बुलढाणा,दि.२९: आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. “माझ्या स्वत:च्या मतदारसंघात तब्बल ५० हजार बोगस मतदार आहेत,” असा धक्कादायक दावा करत त्यांनी सर्वांनाच चक्रावून सोडले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना आमदार गायकवाड यांनी मतदार याद्यांमधील त्रुटींवर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, “विरोधी पक्ष नेहमीच आम्ही बोगस मतांच्या जोरावर निवडून येत असल्याचा आरोप करत असतात. मात्र, मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असूनही हे उघड सांगत आहे की, माझ्या मतदारसंघात ५० हजार बोगस मतदार आहेत. अनेक मतदारांची नावे दुबार तर काहींची पूर्णपणे बोगस आहेत. ही सर्व नावे काँग्रेसच्या काळातील असून ती आता समोर येत आहेत.”
‘या’ प्रक्रियेमुळे ७१ हजार नावे कमी झाली!
एसआयआर (SIR) प्रक्रियेचा संदर्भ देत गायकवाड म्हणाले की, ही पडताळणी सुरू झाल्यापासून त्यांच्या मतदारसंघातील सुमारे ७१ हजार नावे कमी झाली आहेत. “केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अतिशय योग्य काम करत आहेत. आता कुठे खऱ्या अर्थाने पारदर्शक आणि अचूक मतदार यादी तयार होत आहे,” असे सांगत त्यांनी निवडणूक आयुक्तांच्या कारभाराचे कौतुक केले.
सत्ताधारी आमदारानेच थेट आपल्या मतदारसंघातील बोगस मतदारांचा हा भलामोठा आकडा जाहीर केल्यामुळे या दाव्यावर आता राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.








