सोलापूर,दि.19: Solapur Election: जिल्ह्यातील वैराग, माढा, नातेपुते, माळशिरस व श्रीपूर-महाळूंग नगरपंचायतींचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये वैराग, श्रीपूर महाळूंग नगरपंचायतीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. तर माढ्यात कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले. माळशिरस नगरपंचायतीत मोहिते-पाटील समर्थकांनी बाजी मारली. त्याठिकाणी भाजपला यश मिळाले. नातेपुते नगरपंचायतीत मोहिते-पाटील समर्थक तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी वर्चस्व मिळविले. पाचही नगरपंचायतीत शिवसेनेला सत्ता मिळविता आला नाही.
माळशिरस नगरपंचायतीच्या एक जागा बिनविरोध झाली होती उर्वरित 16 जागांसाठी झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवले असून नव्याने महाराष्ट्र विकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी यश मिळवले. असून राष्ट्रवादीला दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर तीन अपक्षांनी निकालात बाजी मारल्याचे चित्र आज स्पष्ट झाले.
वैराग, माढा, नातेपुते, माळशिरस व श्रीपूर-महाळूंग या नगरपंचायतींचा निकाल नुकताच लागला. त्यामध्ये शिवसेनेला म्हणावे तसे यश मिळाले नाही. मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा चेहरा त्याठिकाणी चालला नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही या नगरपंचायतींमध्ये ती दिसली नाही. तिन्ही पक्ष एकमेकांविरुध्द लढल्याचे पहायला मिळाले.
वैराग नगरपंचायत
बार्शी तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या वैराग नगरपंचायतिच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे वैरागचे सुपुत्र निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.17 पैकी 13 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला,चार जागा भाजप(आमदार राजेंद्र राऊत) याना मिळाल्या. तर शिवसेनेचे दिलीप सोपल यांच्या गटाला खाते देखील उघडता आले नाही.
माढा नगरपंचायत
माढा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून सत्ताधारीसाठी गटाने 12 जागा मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले असून राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागेचे नुकसान झाले आहे, तर शिवसेनेने अपक्षासह 3 जागा मिळवत नगरपंचायत मध्ये प्रवेश केला आहे. प्रभाग क्रमांक एकमधून आजिनाथ भागवत राऊत व सुनिता अजिनाथ राऊत हे पती – पत्नी निवडणुकीत विजयी झाले आहेत.
माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे व माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजारनाना भांगे यांचे सुपुत्र आदित्य भांगे यांना पराभवाला सामोरे जावे लागले असून विकास कामाच्या जोरावर काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत एक हाती सत्ता स्थापन केली आहे. माजी नगराध्यक्ष मीनल साठे माजी सभापती कल्पना जगदाळे माजी विरोधी पक्षनेते चंद्रशेखर गोटे माजी नगरसेविका संजीवनी भांगे अनिता चवरे या निवडणुकीत विजयी झाल्या असून माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांच्या पत्नी अर्चना कानडे या विजयी झाल्याने शहरातील प्रमुख नेते मंडळीचा या नगरपंचायतीमध्ये सहभाग पाहायला मिळणार आहेत. माजी नगरसेविका राणूबाई गाडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.