Solapur Accident: सोलापुरात भीषण अपघातात तीन ठार

0

सोलापूर,दि.१६: Solapur Accident: सोलापुरात भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील जगदंबा हॉटेलजवळ शुक्रवारी सायंकाळी चालकाचे सिमेंट बल्कर वाहनाचे टायर फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अन्य वाहनांना धडक देऊन दुभाजकावरून बल्कर विरुध्द दिशेला असलेल्या थेट गॅरेजमध्ये घुसून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर चौघेजण जखमी झाले.

विवेक राजकुमार लिंगराज (वय ५२, रा. सतनाम चौक), तोहिद माजीद कुरेशी (वय २०, रा. सरवदे नगर), आसिफ चाँदपाशा बागवान (वय ४५, रा. दर्गोपाटील नगर, हैदराबाद रोड) अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत. तर वाजिद आसिफ कुरेशी (वय ४३), माजिद मेहबूब चौधरी (वय ३६), करीम बदिशा बेपारी (वय २८), बंडोपंत नागनाथ सुरवसे (वय ५२) हे जखमी झाले आहेत. 

शुक्रवारी (दि.१५) रात्री साडेसहाच्या सुमारास सिमेंट बल्कर (एमएच ४४ यू ७४९५) शहरातून नळदुर्गच्या दिशेने निघाला होता. जगदंबा हॉटेलजवळ बल्करने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर त्याचे अचानक टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी दुसऱ्या दिशेला गेली आणि समोरून येणाऱ्या दुचाकी व अन्य वाहनांना उडवत काम सुरू असलेल्या एका गॅरेजमध्ये घुसली.

वाहनांच्या बॉडी बनविण्याचे काम त्या ठिकाणी सुरू होते. त्यांना ही गाडी धडकली. त्यामुळे तेथे एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गॅरेजमध्ये घुसलेले बल्कर तातडीने बाहेर काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आली. वैद्यकीय मदत पथकही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बचावकार्य वेगाने राबवून जखमी झालेल्यांना बाहेर काढून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले.

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे नेते विवेक लिंगराज हे कामानिमित्त दुचाकीवरून नळदुर्ग येथे गेले होते. तेथून ते दुचाकीवरून परत सोलापूरकडे येत असताना जगदंबा हॉटेलजवळ त्यांच्या दुचाकीला विरुध्द दिशेने येऊन बल्करने जोरदार ठोकरले. त्यात ते व अन्य काही लोक गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारास शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिघांचा मृत्यू झाला. लिंगराज यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here