सोलापूर,दि.२१: हुंडयासाठी छळ केल्याप्रकरणी संगणक अभियंत्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यात हकिकत अशी की, कित्तुर चन्नम्मा नगर सैफुल, जि. सोलापूर येथील रहिवासी नामे अरुण बिरादार, वय – ३६ वर्षे, धंदा संगणक अभियंता, बसण्णा रेवणसिध्द बिरादार, वय -७० वर्षे, धंदा सेवानिवृत्त उच्चपदस्थ अधिकारी, विजयालक्ष्मी बसण्णा बिरादार, वय – ५६ वर्षे, – धंदा – गृहिणी, भिमाशंकर रेवणसिध्दप्पा बिरादार, वय ६५ वर्षे, धंदा शेती, कमलाबाई भिमाशंकर बिरादार, वय ६० वर्षे, धंदा गृहिणी, भारती चनगोंडा बिरादार, वय ४० वर्षे, धंदा गृहिणी यांनी संगनमताने घरातील किरकोळ कारणावरुन यातील अरुण बिरादार यांची पत्नी म्हणजेच फिर्यादीला तुला स्वयंपाक करता येत नाही, कपडे धुता येत नाही, तु घरात व्यवस्थित राहत नाही, असे म्हणून सर्व आरोपींनी शिवीगाळी करुन पाहुण्यासमोर अपमान केला.
हुंडयासाठी छळ प्रकरण संगणक अभियंत्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता
सर्व आरोपी हे आरोपी क्र. १ यास खोटे सांगून फिर्यादीस मारहाण करायला लावत होते. आरोपी क्र. १ याने फिर्यादीस माहेरुन व्यवसाय करण्यासाठी १० लाख रुपये आण म्हणून मारहाण केली. सातलगाव ता. इंडी जि. विजापूर येथे असताना आरोपी क्र. ४ ते ६ यांनी फिर्यादीस शारिरिक व मानसिक त्रास दिला म्हणून फिर्यादीने आरोपींविरुध्द विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. त्याप्रमाणे संबंधित पोलीसांनी सदर गुन्हयामध्ये तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदरचा खटला सोलापूर न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी यांच्याकडे चालला. सदर खटल्यादरम्यान सरकार पक्षाने एकूण ५ साक्षीदार तपासले. सदर साक्षीदारांपैकी तक्रारदार व तक्रारदाराची आई यांची उलटतपासणी सदर खटल्यास कलाटणी देणारी ठरली.
यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर यांनी उलटतपास घेतेवेळी अनेक महत्वाच्या बाबी मा. न्यायालयासमोर आणल्या त्यातल्या काही महत्वाच्या बाबी म्हणजे सदर आरोपी व त्याचा भाऊ हे नावाजलेल्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीस आहेत तसेच फिर्यादीचे सासरे हे सुध्दा शासकीय सेवेत उच्चपदस्थ अधिकारी होते. तसेच आरोपी हे आर्थिकदृष्टया सधन होते. तसेच यातील आरोपी नामे अरुण बिरादार यांनी सदर फिर्यादीस कायदेशीर नोटीस पाठविल्यानंतर सदरची फिर्याद दाखल केलेली आहे ही बाब सुध्दा उलटतपासणीमध्ये उघड झाली.
सदर खटल्यातील अंतिम सुनावणी वेळी आरोपी तर्फे युक्तीवाद करतेवेळेस वरील बाबींचा उहापोह करून फक्त आणि फक्त सदर आरोपींना त्रास देण्याच्या हेतूने सदरची फिर्याद दाखल केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकामी आरोपींच्या वकिलांतर्फे सर्वोच्च न्यायालयातील एका अत्यंत गाजलेल्या खटल्याचा आधार घेण्यात आला.
सदरचा आरोपींतर्फे केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन यातील आरापींची न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. संतोष आवळे, ॲड. सुमित लवटे, ॲड. फैयाज शेख यांनी काम पाहिले.